अडीच हजार कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढ्या गॅसची सुरू होती चोरी; राज्यस्तरीय दक्षता पथकाने केला पर्दाफाश; चौघांच्या मुसक्या आवळल्या; दोन टँकरसह १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त!

छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने गॅस वाहतूक करणार्या टँकरचे सील तोडून धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात हे गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. यात १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या टोळीतील दोघे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजचे, तर उर्वरित दोघांपैकी प्रत्येकी एक जण ठाणे व बीड येथील आहे.
पुरवठा विभागाचे शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथक प्रमुख गणेश बेल्लाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैजापूर रोडवरील हॉटेल साईयश जवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एचपी कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी सुरू असतानाच पथकाने धाड टाकली आणि या टोळीला रंगेहाथ पकडले. श्रीकृष्ण सखाराम दहिफळे (रा. खोडवा सावरगाव, ता. परळी, जि. बीड), मिराज मोहम्मद जैश खान (रा. ९० फुटी रोड, टिटवाळा, अंबरनाथ, जि. ठाणे), महेश विष्णू थोरात (रा. वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर) आणि श्रीहर छेदी (रा. वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर) अशी या चौघांची नावे आहेत.
जप्त केलेल्या मालाचा तपशील
* दोन महाकाय टँकर : क्र. एमएच ४३ सीके ५९२१ आणि एमएच ४३ सीके ५७४७ (एकूण ३५ हजार २२० किलो गॅस).
* सिलेंडर साठा : व्यावसायिक (१९.२ किलो) आणि घरगुती (१४.२ किलो) अशा एकूण २६ सिलेंडरचा अवैध साठा.
* एकूण जप्त किंमत: अंदाजे १ कोटी २६ लाख रुपये
अडीच हजार कुटुंबांना पुरेल एवढा गॅस
जप्त करण्यात आलेला गॅस साठा तब्बल २ हजार ४८० गरीब कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता, अशी माहिती देत प्रशासकीय अधिकार्यांनी या कारवाईचे गांभीर्य सांगितले. गॅस माफिया स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनाचा काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
कडक कायदेशीर पाऊले
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे.
“अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तूंची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाईल.”
– चंद्रकांत डांगे (भाप्रसे, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख)



