आधी पत्नीला दगडाने ठेचून मारले, मग स्वत:ही गळफास लावून घेतला; खून करताना महिलेने पाहिल्याने भीतीपोटी कृत्य; तळोदा तालुक्यातील थरार

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एका थरारक घटनेने तळोदा तालुका हादरला आहे. पत्नीला दगडाने ठेचून मारल्यानंतर एका तरुणाने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रावलपाणी येथे घडली. या तरुणाला पत्नीचा खून करताना एका महिलेने पाहिल्यानंतर त्याने भीतीपोटी स्वत:ही जीव दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सुभाष पावरा (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याची पत्नी मनीषा अनिल पावरा (२७) ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता अनिलने तिचा पाठलाग करून आसपास कुणीही नसल्याची संधी साधत दगडाने हल्ला करून तिला ठार केले.
आसपास कुणीच नाही, असे अनिलला वाटत असले तरी ही घटना एका महिलेने पाहिली. ही बाब लक्षात येताच अनिलने भीतीपोटी तेथून पळ काढला. मात्र, आपण पत्नीचा खून केल्याचे सगळ्यांना कळणार, या भीतीने तो गांगरून गेला. याच भीतीपोटी किंवा आधीपासून सुरू असलेल्या मानसिक आजारातून त्याने घरी जावून स्वत:ही गळफास लावून घेत आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी तातडीने रावलपाणी येथे धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. याचवेळी शेलकुवी येथून मनीषा हिच्या नातेवाईकांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी केल्यावर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पुढील सोपस्कारासाठी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.



