गुन्हे वार्ता

अंगणवाडी सेविकेच्‍या खुनाचा प्रयत्‍न; मागून येत तलवारीने वार; दैव बलवत्तर म्‍हणून प्राण वाचले, पण गंभीर जखमी; अक्‍कलकुवा तालुक्‍यातील थरारक प्रकार

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : माझ्‍या जागेत अंगणवाडी का बांधली, असा जाब विचारत अंगणवाडीतील मदतनीस युवतीवर तलवारीने वार केल्‍याची गंभीर घटना अक्‍कलकुवा तालुक्‍यातील काकडीआंबा गावात घडली. या घटनेत सदर २५ वर्षीय युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्‍यावर सध्‍या नंदुरबारमध्‍ये उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, अक्‍कलकुवा पोलिसांनी आरोपीच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काकडीआंबा येथे गावात अंगणवाडीची उभारणी करण्‍यात आली असून, ही अंगणवाडी आपल्‍या खासगी जागेत सुरू करण्‍यात आल्‍याचे सुकलाल गुलाबसिंग तडवी (रा. काकडीआंबा, ता. अक्‍कलकुवा, जि. नंदुरबार) याचे म्‍हणणे आहे. या कारणावरून त्‍याच्‍या मनात गेल्‍या काही दिवसांपासून राग होता. अंगणवाडी सेविका मदतनीस म्‍हणून या अंगणवाडीत काम करणारी रोहिता प्रवीण वसावे (२५, रा. काकडीआंबा) ही तरुणी गुरुवारी (दि. २) सकाळी ९.३० ते १० वाजेच्‍या दरम्‍यान गावातील मुलांना अंगणवाडीत येण्‍यासाठी आमंत्रित करून परत अंगणवाडीत येत असताना अचानक मागून आलेल्‍या सुकलाल तडवी याने रोहिता यांच्‍यावर तलवारीने हल्‍ला चढवला. अचानक झालेल्‍या या हल्‍ल्‍याने रोहिता वसावे गांगरून गेली. मात्र, तशाही परिस्‍थितीत त्‍यांनी प्रसंगावधान राखून वार चुकवण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, या हल्‍ल्‍यात त्‍यांच्‍या डोक्‍याला मागील बाजूस तसेच उजव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर तलवारीचे वार बसले आणि त्‍या गंभीर जखमी झाल्‍या.
घटनेची माहिती मिळताच अक्‍कलकुवा पोलिसांनी तातडीने काकडीआंबा गावात धाव घेत गंभीर जखमी अवस्‍थेतील रोहिता वसावे यांना उपचारासाठी आधी खापर प्राथमिक आरोग्‍य केंद्रात व तेथून अक्‍कलकुवा ग्रामीण रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांना नंदुरबारच्‍या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.
दरम्‍यान, अक्‍कलकुवा पोलिसांनी आरोपी सुकलाल तडवी याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या असून, अटकेनंतर त्‍याला अक्‍कलकुवा येथील प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांच्‍या न्‍यायालयासमोर उभे करण्‍यात आले. तेथे त्‍याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली. सध्‍या पोलिस निरीक्षक सारंग नवलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button