मुख्य बातम्या

महाराष्‍ट्र हादरला : सिमेंटच्‍या खांबाला बांधून मारहाण करीत मनोरुग्‍णाची निर्घृण हत्‍या; अक्‍कलकुव्‍याच्‍या जांभीपाणीपाडात संतापजनक प्रकार; चारपैकी एक आरोपी अल्‍पवयीन

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदनगरी म्‍हणून ओळख असलेल्‍या नंदुरबार जिल्‍ह्यातून महाराष्‍ट्राला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा जांभीपाणीपाडा येथे चौघांनी ४४ वर्षीय व्‍यक्‍तीला सिमेंटच्‍या खांबाला बांधून लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करीत त्‍याची निर्घृण हत्या केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यासह अवघे राज्‍य हादरले आहे. या प्रकरणी मोलगी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्‍याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.  
​पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, महेंद्र हात्या वसावे (रा. मोलगीचा सोराचापडा, ता. अक्‍कलकुवा, जि. नंदुरबार) असे हत्‍या झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव असून, डोक्‍यावर परिणाम झाल्‍याने तो मनोरूग्‍णासारखा वागत असे. त्‍यातच त्‍याने १ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास आरोपी बामण्या पाश्या राऊत याच्या घरात घुसून गिमलीबाई राऊत हिला मारहाण केली होती. यामुळे राऊत कुटुंबाच्‍या मनात त्‍याच्‍याबद्दल संताप होता. याच रागातून आरोपींनी कायदा हातात घेत महेंद्र याला मारहाण करीत यमसदनी धाडले.
सर्वात प्रथम राऊत कुटुंबातील सदस्‍यांनी महेंद्र वसावे याला पकडून घरातील सिमेंटच्या खांबाला दोराने बांधले. यानंतर या कुटुंबातील चारही सदस्‍य लाथा-बुक्‍के व लाठ्याकाठ्यांसह त्‍यांच्‍यावर तुटून पडले. हातपाय बांधलेले असल्‍याने महेंद्रला हालचालही करता येत नव्‍हती. त्‍याच्‍या या असहाय्यतेचा फायदा घेत राऊत कुटुंबियांनी त्‍याला इतकी बेदम मारहाण केली की त्याचा जागीच मृत्यू झाला.
​या प्रकरणी महेंद्र पत्नी लिलावाई वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) आणि ३ (५) नुसार संशयित बामण्या पाश्या राऊत, गिमलीबाई बामण्या राऊत, दिनेश बामण्या राऊत व एक अल्‍पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, सहायक पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक पावरा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
एकाला अटक, एक फरार, तिसरी दवाखान्‍यात
तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतलेल्‍या पोलिसांनी तातडीने बामण्या पाश्या राऊत या आरोपीला अटक केली. सध्‍या न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार त्‍याला शनिवार (दि. ४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍यात आले आहे. तर गिमलीबाई बामण्या राऊत ही जखमी असून, तिच्‍यावर सध्‍या दवाखान्‍यात उपचार सुरू आहेत. तिसरा आरोपी दिनेश बामण्या राऊत सध्‍या फरार असून, पोलिस त्‍याचा शोध घेत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button