हृदयद्रावक : उघड्या विहिरीत कार कोसळली, एकाच कुटुंबातील ९ ठार; स्नेहसंमेलनाहून परतताना रात्री उशीरा काळाचा घाला

नाशिक (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री उशीरा काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शिवाजीनगर परिसरातील शेतातील विहिरीत एक कार अनियंत्रित होऊन कोसळली. या दुर्दैवी अपघातात कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. दगावलेल्यांमध्ये सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरीच्या शिवाजीनगर भागात राजे बँक्वेट हॉल व मंगल कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. हे स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगोडे कुटुंब इर्टिगा कारमधून (एमएच १५ जेएस १०५३) परत निघाले असता मंगल कार्यालयापासून जवळच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्रीची वेळ, दाट अंधार, विहिरीतील खोल पाणी आणि चिखल यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. अखेर, रात्री उशिरा क्रेन आणि हायड्रा मशीन पाचारण करण्यात आले. या यंत्रांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सर्व ९ ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
ठार झालेले सर्व एकाच कुटुंबातील
या भीषण अपघातात मृत्यू झालेले सर्व जण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सुनील दत्तात्रय दरगोडे (३५), रेश्मा सुनील दरगोडे (३३), राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे (१६), श्रेयस अनिल दरगोडे (११), माधुरी अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, समृद्धी राजेश दरगोडे (७) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



