खुशखबर : नंदुरबार, शहादाकरांना राज्य शासनाचे ‘गिफ्ट’; दोन्ही तालुक्यांत होणार अपर तहसील कार्यालये, महसुली कामे होणार फटाफट

नंदुरबार / शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य शासनाने नंदुरबार आणि शहादा तहसीलदारांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांचा व्याप काही अंशी कमी केला आहे. या दोन्ही तालुक्यांसाठी अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी मिळाली असून, दोन्ही शहर व तालुक्यांची वाढलेली लोकसंख्या व कामाचा वाढता व्याप पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यांतील जनतेची महसुली कामे वेगाने होण्यास मदत मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा या दोन शहरांचा वेगाने विस्तार होत असून, या दोन्ही तालुक्यांची लोकसंख्याही दुपटीने वाढली आहे. यामुळे सध्या या दोन तालुक्यांसाठी असलेल्या तहसील कार्यालयांवर महसुली कामाचा ताण वाढला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी या दोन्ही तालुक्यांसाठी अपर तहसील कार्यालयांना मंजुरी दिली आहे. राज्याच्या महसूल विभागाने विद्यमान तहसील कार्यालयांवरील वाढत्या कामाच्या बोझ्याचा विचार करून राज्यभरातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अपर तहसील कार्यालयांसाठी प्रस्ताव मागवले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मार्च २०२५ मध्ये नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यांसाठी हे प्रस्ताव पाठवले होते. त्याला मंजुरी मिळाली आणि दोन दिवसांपूर्वी २ एप्रिल रोजी तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सहा तहसील, तीन अपर तहसील कार्यालये
राज्य शासनाच्या नव्या मंजुरीमुळे आता नंदुरबार जिल्ह्यात सहा तहसील, तर तीन अपर तहसील कार्यालये होणार आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे याआधीच अपर तहसील कार्यालयाला मंजुरी मिळाली होती. आता जिल्ह्यात आणखी दोन अपर तहसील कार्यालये वाढणार असल्याने जिल्ह्यातील महसुली कामे वेगाने होण्यास मदत मिळणार आहे.
लवकरच पदभरती
मोलगी येथे आधीपासूनच अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, तेथे अजूनही कर्मचार्यांची भरती करण्यात आलेली नाही. आता मोलगीसह नंदुरबार व शहादा येथील नव्या अपर तहसील कार्यालयांना कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा,, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच विभागीय आयुक्तांना पदभरतीचा आराखडा पाठवणार आहे. त्यास अंतिम मंजुरी मिळताच तिन्ही कार्यालयांसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल.



