नंदुरबार जिल्हा

गारपिटीने नंदुरबारच्‍या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले; तब्‍बल ३ हजार एकरवरील पिके भुईसपाट, ज्‍वारीला सर्वाधिक फटका

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : गेल्‍या दहा दिवसांत झालेल्‍या गारपिटीने नंदुरबार जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. वादळी वार्‍यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्‍ह्यात तब्‍बल ३ हजार एकरवरील पिकांचे नुकसान झाले असल्‍याचा प्राथिमक अंदाज कृषी विभागाकडून व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये सर्वाधिक फटका ज्‍वारी पिकाला बसल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.
हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार अवघ्‍या नंदुरबार जिल्‍ह्याला ३० मार्च आणि त्‍यानंतर पुन्‍हा तीन दिवसांनी झालेल्‍या अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. वादळी वार्‍यासह अवचित बरसलेला अवकाळी पाऊस आणि झालेली जोरदार गारपिट यामुळे नंदुरबारसह धडगाव, अक्‍कलकुवा, शहादा व तळोदा या तालुक्‍यांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. ३० मार्चला झालेल्‍या अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका सुमारे २५० हेक्‍टवरील शेतीला बसल्‍याचे सांगण्‍यात आले होते. तर दुसर्‍या टप्‍प्‍यात ६२ गावांतील सुमारे ८५० हेक्‍टर जमिनीवरील पिके आडवी केल्‍याचा अंदाज आहे. याशिवाय आंबा पिकाचे झालेले नुकसान गृहित धरता एकूण १२०० हेक्‍टर जमिनीवरील पिके या अवकाळी पाऊस व गारपिटीने आडवी केल्‍याचे सांगण्‍यात येते.
नंदुरबारला सर्वाधिक फटका, ज्‍वारीचे सगळ्‍यात जास्‍त नुकसान
वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नंदुरबार तालुक्‍याला बसल्‍याचे समोर आले आहे. यामध्‍ये ६२ गावांतील ९५० हून अधिक शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. यात २७५ हेक्‍टरमधील ज्‍वारी, ९० हेक्‍टर मका, १३७ हेक्‍टर बाजरी, गहू ६१, हरभरा १४ तर भुईमुगाचे २ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्‍याची माहिती पुढे आली आहे. दरम्‍यान, अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरूच असून, पंचनामे अंतिम झाल्‍यानंतर नुकसानीचा नेमका आकडा पुढे येईल, असे सांगण्‍यात येते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button