कुत्रा चावल्याने वासरू गेलं अन् गायीचं दुध पिणार्यांचा जीव खाली-वर झाला; रेबीजचे इंजेक्शन पुरवताना आरोग्य यंत्रणेची दमछाक!; शहादा तालुक्यातील प्रकार

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गाय व्याल्यानंतर काही दिवसांतच या गायीचे वासरू कुत्र्याने चावा घेतल्याने मरण पावले. पण यामुळे या गायीच्या दुधाची बंदी लावणार्या हिंगणा (ता. शहादा) गावकर्यांची जीवाच्या भीतीने रेबीजची लस टोचून घेण्यासाठी धावपळ उडाल्याचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही लस पुरवताना आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली.
हिंगणी येथील एका शेतकर्याची गाय काही दिवसांपूर्वी व्याली आणि तिने एका गोंडस वासराला जन्म दिला. या काळात गावातील काही कुटुंबांनी या गायीच्या दुधाची बंदी लावली होती. पण नेमके काही दिवसांनी या गायीच्या बछड्याला गावातील भटक्या कुत्र्याने चावा घेतला. शेतकर्याने पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून या वासरावर उपचार करून घेतले. यामुळे वासरू ठणठणीत बरे झाले. या वासराला रेबीज आजार झाल्याची कुठलीही लक्षणे नव्हती. असे असताना दोन दिवसांपूर्वी अचानक त्या वासराचा मृत्यू झाला.
कुत्रा चावल्याच्या काळात या वासराने गायीचे दुध पिले होते. कुत्रा चावल्यामुळे या वासराला रेबीजची लागण झाली असावी आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, या शंकेने या गायीच्या दुधाची बंदी लावणार्यांची पाचावर धारण बसली. दुध पिताना या वासराच्या लाळेचा संबंध गायीशी आला आणि तिचेच दुध आपणही पिले, यामुळे आता आपल्यालाही रेबीजची लागण आपल्यालाही होणार, अशी धडकी या वासराची माता असलेल्या गायीचे दुध पिणार्यांच्या मनात बसली. या सर्वांनी रेबीज होण्याच्या भीतीने तातडीने रेबीजची लस टोचून घेण्यासाठी दवाखान्यात धाव घेणे सुरू केले.
मुले, मुली, पुरूष, महिला अशा तब्बल ५१ जणांनी या गायीच्या दुधाचे सेवन केले होते. या सगळ्यांनीच दवाखान्यात धाव घ्यायला सुरूवात केल्याने आरोग्य यंत्रणाही हडबडून गेली होती. एकाच वेळी रेबीज प्रतिबंधक लस एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणाही अडचणीत आली होती. अखेर आरोग्य यंत्रणेने धावपळ करीत ही लस गावात उपलब्ध करून घेतली आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.एल. बुवा, डॉ. प्रधान, डॉ. हार्दिक पटेल, डॉ. नवीन पाटील, डॉ. हर्षल पाटील, डॉ. राकेश पाटील, आशा कर्मचारी चंद्रकला पवार आदींनी लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे पार पाडली. तर वडाळीचे माजी उपसरपंच दीपक पाटील, खैरवेचे माजी सरपंच उमेश पाटील, हिंगणीचे माजी उपसरपंच चंद्रकांत पटेल, जि.प.च्या माजी सभापती हेमलता शितोळे आदींनी या मोहिमेत आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले. मात्र, एकंदरीत या प्रकाराची अवघ्या तालुक्यात चर्चा सुरू राहिली.



