‘उद्या सुट्टीच आहे, माझ्या अंत्यसंस्काराला या’… भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवले जीवन

नागपूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘उद्या रविवार आहे. तुम्हाला मुद्दाम सुटी घेण्याची गरज नाही. माझ्या अंत्यसंस्काराला या’, अशा शब्दांत पतीलाच अंत्यसंस्काराचे आमंत्रण देऊन एका विवाहितेने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यांतर्गत महादुला परिसरात घडलेल्या या घटनेत आत्महत्या करणार्या तरुणीचे नाव मयुरी लोंढे असे आहे.
लोंढे पती-पत्नीमध्ये वाद असल्याने मयुरी गेल्या महिन्यात माहेरी आली होती. कौटुंबिक कलहामुळे ती मानसिक तणावात होती. आत्महत्येपूर्वी तिने पती संदीप याला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने तिचा तणाव वाढला आणि त्यातूनच तिने गळफास लावून घेत आत्महत्या केली. यावेळी तिचे माहेरचे कुटुंब बाहेर गेलेले होते. ते रात्री परतल्यावरच त्यांना ही बाब लक्षात आली. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली. मयुरीने पतीला उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीत मनातील दु:ख आणि सोसलेला मानसिक त्रास मांडला आहे.
डोळे पाणावतील असा मजकूर
‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते संदीप. तुम्ही मला समजून घेत नाही. दीड महिन्यापासून रोज तुम्हाला समजावत होते. मला रोज एक आशा होती की तुम्ही समजून घ्याल. पण तुम्ही समजून घ्यायला तयार नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला समजून थकले , म्हणून तुमच्यापासून दूर जात आहे. याला जिम्मेदार तुम्ही आहात संदीप. तुम्हाला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टी घेण्याची गरज पडणार नाही. उद्या रविवार आहे, माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे, तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच तयार झाली आहे. या वेळ काढून. तुम्ही मला मजबूर केलं म्हणून मी तुमच्यामुळे आत्महत्या करीत आहे.’, असे मयुरीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पती संदीप याला उद्देशून लिहून ठेवले आहे.



