शहादा- खेतिया रस्त्यावर भीषण अपघात; उधारीची वसुली करून परतणार्या दुकानदाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा ते खेतिया (मध्यप्रदेश) रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्घटना घडली. लोटन फकिरा मराठे असे या दुकानदाराचे नाव असून, उधारीची वसुली करून परत जात असताना खेडदिगर गावाजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटन मराठे (रा. हनुमान चौक, खेतिया, ता. पानसेमल, जि. बडवाणी, म.प्र.) हे शनिवारी (दि. ४) दुकानाची उधारी वसुली करण्यासाठी शहादा येथे आले होते. तेथे वसुली करून संध्याकाळी गावी परतत असताना खेडदिगर (ता. शहादा) गावातील जगमा इंग्लिश मीडियम स्कूलसमोर पाठीमागून भरधाव वेगात येणार्या अज्ञात वाहनाच्या चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून त्यांच्या स्कुटीस जोरदार धडक दिली. यामध्ये मराठे रस्त्यावर फेकले जावून जबर जखमी झाले. संध्याकाळची वेळ असल्याने त्यांना बराच वेळ मदत मिळू शकली नाही.
अखेर उशीरा या रस्त्याने जाणार्या काही जणांनी पोलिसांना कळवल्यानंतर म्हसावद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मराठे यांना तातडीने शहाद्यातील रुख्मिनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर शहाद्याच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, दुसर्या दिवशी लोटन मराठे यांचा मुलगा संदीप याने म्हसावद पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद नोंदवली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या वाहनाचा शोध घेत आहेत. पोलिस हेडकॉन्स्टेबल नीलेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



