शहाद्यात ’बकरी चोर गँग’चा धुडगूस; ब्राह्मणपुरीनंतर आता कुकावलमधून बोकड, बकर्या पळवल्या
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यात बोकड, बकर्या चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून, ब्राह्मणपुरी गावात या गँगने चक्क कारमध्ये घालून दोन बकर्या चोरल्याच्या घटनेला चोवीस तासही उलटत नाही तोच आता सारंगखेडा हद्दीतील कुकावल गावातून चक्क सात बकर्या व बोकडांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही चोर्यांचा परस्परांशी संबंध आहे का, याचा शोध घेण्याचे आव्हान शहादा व सारंगखेडा पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
हायटेक चोरट्यांनी शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी शिवारात पारुबाई काळू ठाकरे या वृद्धेला धारदार शस्राचा धाक दाखवून त्यांच्या दोन बकर्या कारच्या डिकीत घालून पळवून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर आता शहादा तालुक्यातीलच सारंगखेडा पोलिस ठाणे हद्दीतून ७ बकर्या चोरीला गेल्या आहेत. कुकावल येथील रशीद झुलफू मौला पटेल यांनी राहत्या घराच्या बाजूलाच उभारलेल्या शेडमध्ये बोकड व बकर्या बांधून ठेवल्या होत्या.
रात्री ९ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी एकूण ७ बकर्या व बोकड पळवून नेल्या. यामध्ये २ बोकड, पांढर्या व लाल रंगाची प्रत्येकी एक बकरी आणि ३ काळ्या रंगाच्या बकर्या यांचा समावेश असून, या सर्वांची एकत्रित किंमत सुमारे ३५ हजार रुपये आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोहेकॉ रामदास पावरा या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



