आश्रमशाळेतून भरदिवसा १४ वर्षीय मुलाचे अपहरण; तळोदा तालुक्यातील धक्कादायक घटना
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यात आश्रमशाळेतील ८ वर्षीय मुलाचा तेथीलच सेफ्टी टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता तळोदा तालुक्यातील एका आश्रमशाळेतून भरदिवसा १४ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तळोदा तालुक्यातील जांभई पोस्ट छोटा धनपूर या ठिकाणी आश्रमशाळा चालविण्यात येते. या ठिकाणी असंख्य विद्यार्थी शिक्षण घेतात. यातीलच एका १४ वषींय मुलाचे ४ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने त्याला आमिष दाखवून पळवून नेले. या विद्यार्थ्याला आश्रमशाळेच्या वसतिगृहातून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद जांभई आश्रमशाळेचे अधीक्षक राजेश कपुरचंद भावसार यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. सध्या पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश साळी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



