नंदुरबार जिल्हा

भोंदूबाबाच्‍या नादी लागणार्‍या आमदारांचे राजीनामा घ्‍या; माकप आक्रमक, शहाद्यात आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्यातील कथित बुवाबाजी प्रकरणावरून ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) शहादा तालुका कमिटीच्या वतीने सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देत संबंधित आमदारांची यादी जाहीर करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
लोकप्रतिनिधी हे संविधानिक पदावर असून, त्‍यांच्‍यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची जबाबदारी आहे. मात्र, काही आमदार तंत्र-मंत्र, जादूटोणा यांसारख्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याचे समोर येत आहे. असे वर्तन संविधानिक जबाबदारीला धरून नसून समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे, असा आरोप माकपने केला आहे.
भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याबरोबरच त्याला समर्थन देणाऱ्या लोकप्रतिनिधींवरही कारवाई करावी, अशी मागणीही पक्षाने निवेदनाद्वारेकेली आहे. तसेच, या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असल्याने त्यांच्या सन्मानाला धक्का बसत असून असे व्हिडिओ तत्काळ हटवावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात वाढत चाललेल्या भोंदू बाबांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशा मागण्याही माकपतर्फे करण्यात आल्या.
या आंदोलनात कॉ. सुनील गायकवाड, कॉ. भिका ब्राह्मणे, कॉ. सुदाम चौधरी, कॉ. संतोष गायकवाड, कॉ. मेहरबान पावरा, कॉ. राजाराम ठाकरे, कॉ. हारू सोनवणे, कॉ. किरण मोरे, कॉ. खडूं भाऊ सामुद्रे, कॉ. जिरा बाई ठाकरे, छाया बाई पानपाटील, दिनेश पेंडरकार, कॉ. मासूम मन्यार, कॉ. दिनेश गुलाले, कॉ. रफिक शेख, कॉ. लखा दादा आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button