शहादा शहर बनले कचर्याचे आगार : नगर पालिकेकडून दुर्लक्ष, रहिवासी वैतागले, त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहर कचर्याचे आगार बनले असून, नगर पालिकेकडून साफसफाईबाबत पावले उचलली जात नसल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता या मुद्द्यावर स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत या विषयात प्रशासनाने त्वरित लक्ष न घातल्यास पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व प्रेस मारूती परिसरातील रिकाम्या भूखंडावर रहिवाशांनी सांडपाणी सोडले आहे. यामुळे परिसरात घाण पसरली असून, दुर्गंधी येत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, लहान मुलांना याचा मोठा त्रास होत आहे. याबाबत स्थानिकांनी सुमारे महिनाभरापूर्वी तक्रार केली आहे. मात्र, यावर कारवाई करण्यास नगर पालिका प्रशासनाला अद्याप तरी वेळ मिळालेला नसल्याचे या भागातील लोकांचा आरोप आहे. मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आरोग्य विभागाचे प्रमुख गोविंद थोरात यांना आदेश देऊन सदरील पाणी तातडीने बाहेर काढण्याची अपेक्षा या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या सांडपाण्यामुळे या भागातील रहिवाशी वैतागले असून, पालिका प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिका प्रशासनाची उदासिनात आश्चर्यकारक असून, हा प्रश्न तातडीने न सोडवल्यास पालिकेसमोर आंदोलन सुरू करू असा इशारा श्री शिव छत्रपती ग्रूपचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह रहिवाशांनी दिला आहे.



