नंदुरबारच्या दोन कनिष्ठ सहायकांनी घातला सरकारला ५४.५१ लाखांचा गंडा; मुलांच्या पोषण आहाराच्या नावावर केले स्वत:चेच ‘उदरभरण’!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महिला बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना पुरक पोषण आहार दिला जात नाही, याची कल्पना असूनही हेच कृत्य करून खोटी बिले सादर करून शासनाला ५४ लाख ५१ हजार रुपयांचा गंडा घालणार्या दोन कनिष्ठ सहायकांविरोधात नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही संशयित आरोपींचा सध्या पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२५ कालावधीत झालेल्या या कालावधीत हा भ्रष्टाचार झाला होता. प्रशांत रमेश भामरे (कनिष्ठ सहायक, तत्कालिन नेमणूक एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प, रनाळे ता. व जि. नंदुरबार) आणि दीपक आनंदा शिंदे (कनिष्ट सहायक, तत्कालिन नेमणूक महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा परिषद नंदुरबार) अशी शासनाची फसवणूक करणार्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.
कुपोषणामुळे सर्वाधिक बालमृत्यूची नोंद असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालविकास विभागात दोन कर्मचार्यांनी लहान मुलांच्या पोषण आहार योजनेत अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून खोटी बिले सादर करीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. एकात्मिक बालविकास सेवा योंजना प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रांना पुरक आहार वाटप केला जात नाही, याची कल्पना असूनही प्रशांत भामरे याने पदाचा गैरवापर करीत महिला बचत गटाचे पुरक पोषण आहाराचे बनावट मागणीपत्र बालविकास प्रकल्प अधिकार्यांना सादर केले होते. विशेष म्हणजे नंतर याच अधिकार्याला कल्पना न देता त्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून ते वरिष्ठ स्तरावर पाठवून या बिलांच्या रकमेला मंजुरीही मिळवण्यात आली.
एवढेच नव्हे तर प्रशांत भामरे व दीपक शिंदे या दोन्ही आरोपींनी संगनमत करून एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प अक्कलकुवा, तोरणमाळ, पिंपळखुटा, नंदुरबार या ठिकाणच्या कार्यालयांतील विविध खर्चांची बिलेही वरिष्ठांना अंधारात ठेवून आणि त्यांच्या खोट्या स्वाक्षर्या करून सादर करीत त्यास मंजुरी मिळवून घेतली, असे समोर आले होते. या बिलांमध्ये सीबीई कार्यक्रम, मोबाईल रिचार्ज, पोषण पंधरवाडा, आयईसी पोषणा महिना, अंगणवाडी भाडे, वाहन भाडे, प्रशासकीय खर्च, साडी, गणवेश आदींचा समावेश होता.
भ्रष्टाचाराची ही संपूर्ण ५४ लाख ५१ हजार ४१६ रुपयांची असून, या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने हरिभाऊ महादू हाके यांनी शनिवारी दोन्ही संशयित आरोपींच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार प्रशांत भामरे व दीपक शिंदे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक नीलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपींना अटक झालेली नसून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



