नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्‍ह्यात अद्याप ३.७९ लाख मतदारांचे मॅपिंग बाकी; प्रक्रिया पूर्ण करण्‍यात नवापूर नंबर वन तर नंदुरबार तालुका तळाला

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यातील मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्‍या विशेष माहिती पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेचे जिल्‍ह्यात ७२ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तरी अजून तब्‍बल ३ लाख ७९ हजार मतदारांचे मॅपिंग बाकी असल्‍याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्‍हणजे एसआयआर मॅपिंगमध्‍ये दुर्गम भाग असलेल्‍या नवापूर तालुक्‍याने आघाडी घेतली असून, शहरी भाग असलेला नंदुरबार तालुका मात्र याबाबतीत जिल्‍ह्यात सर्वात तळाला असल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.
नंदुरबार जिल्‍ह्यात सध्‍या २००२ च्‍या मतदार यादीचे २०२४ च्‍या यादीशी मॅपिंग सुरू आहे. गेल्‍या महिनाभरापासून जिल्‍हा प्रशासनाने या कामाला गती दिली आहे. जिल्‍ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या टप्‍प्‍यावर हे मॅपिंगचे काम सुरू आहे. जिल्‍ह्यात एकूण १३ लाख ५७ हजार ५१८ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ७७ हजार ४३७ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून, ही टक्‍केवारी ७२.०१ टक्‍के इतकी आहे. याचा अर्थ ३ लाख ७९ हजार ४८७ मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे.
या मोहिमेत जिल्‍हाभरात १ हजार ४३४ बीएलओ घरोघरी जावून मतदारांची पडताळणी करीत असून, या प्रक्रियेला गती देण्‍यासाठी प्रशासनाने विशेष पथकांचीही नियुक्‍ती केली आहे. मात्र, अनेक मतदारांकडे आधारकार्ड, ओळखपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र अशी कागदपत्रे अद्ययावत नसल्‍याने त्‍यांचे मॅपिंग प्रलंबित राहत असल्‍याचेही सांगण्‍यात येते.
नंदुरबार तालुक्‍यात अवघे ६७ टक्‍के काम
एसआयआर मॅपिंग मोहिमेत जिल्‍ह्यात सर्वांत कमी ६७.२० टक्‍के काम नंदुरबार मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात ३ लाख ६१ हजार ३०२ मतदार असून, यापैकी २ लाख ४२ हजार ७९० मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. याउलट नवापूर मतदारसंघात सर्वाधिक ८०.३६ टक्‍के काम झाले आहे. या मतदारसंघात ३ लाख ८९५ मतदार असून, त्‍यापैकी २ लाख ४१ हजार ८११ मतदारांचे मॅपिंग आतापर्यंत पूर्ण झाले आहे. अक्‍कलकुवा मतदारसंघात ३ लाख ३३ हजार ७०२ मतदार असून, पैकी २ लाख ३८ हजार ८३३ मतदारांचे मॅपिंग झाले आहे. ही आकडेवारी ७१.४२ टक्‍के इतकी आहे. तर शहादा मतदारसंघात ७०.४० टक्‍के म्‍हणजेच ३ लाख ६१ हजार ५०१ पैकी २ लाख ५४ हजार ५०३ मतदारांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button