मुख्य बातम्या

एसटीचा प्रवास दोन रुपयांनी महागणार; महामंडळ प्रत्येक तिकिटावर आकारणार दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच आता त्यात एसटी बसच्या तिकीट दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) आपल्या बस, बसस्थानके आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आता प्रत्येक प्रवाशांकडून तिकिटामागे दोन रुपये वाढीव शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या शेकडो बसेस मधून दररोज राज्यभरात सुमारे ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. या बसेस जेथून प्रवासाची सुरुवात आणि अंत करतात ती बसस्थानके मात्र स्वच्छतेच्या विळख्यात सापडलेली आहेत. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेताना ही बसस्थानके व तेथील परिसर स्वच्छ ठेवणे ही राज्य मार्ग परिवहन मंडळाची जबाबदारी आहे. परंतु, गेली वर्षानुवर्षे एसटी महामंडळ तोट्यात असून, बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी महामंडळाकडे पैसाच उरत नसल्याची माहिती पुढे आली आहे.  
ही जबाबदारी पुढे नेताना एसटी महामंडळाने राज्यातील प्रत्येक बसस्थानक व त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला आहे. या स्वच्छतेसाठी लागणारा पैसा मात्र महामंडळ प्रवाशांच्या खिशातून वसूल करणार आहे. एस. टी. महामंडळ आता प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार लावणार असून, येत्या १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या अधिभार वसुलीतून महामंडळाला दररोज एक कोटी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, या रकमेतून राज्यभरातील २५१ आगार आणि ५९८ बसस्थानके स्वच्छ ठेवली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button