‘चोरी पाप आहे’ शिकवणाऱ्या शाळेतच चोरी; सुटीचा गैरफायदा घेत टीव्ही लांबवला, शहादा तालुक्यातील प्रकार
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बालमनावर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीने त्यांना चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण शाळांतून दिली जाते. याच अनुषंगाने शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चोरी करणे पाप आहे, असे शिकवतात. परंतु, ही शिकवण मागे ठेवत अज्ञात चोरट्यांनी चक्क शाळेतच चोरी केल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यात घडली आहे.
शहादा तालुक्यातील बामखेडा त.सा. येथे जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा असून, या शाळेतून चोरट्यांनी एलईडी टीव्ही चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ही शाळा चार एप्रिलपासून सुटीमुळे बंद होती. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने शाळा बंदच होती. याचाच गैरफायदा चोरट्यांनी घेतला. सोमवारी शाळा नियमित सुरू झाल्यानंतर एका वर्गात लावलेला एलईडी टीव्ही गायब असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सारंगखेडा पोलिसांच्या कानावर ही बाब घातली. शाळेच्या वतीने शिक्षिका स्वाती मधुकर सोनवणे यांनी तक्रार दाखल केली असून, यात नऊ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरीला गेल्याचे म्हटले आहे. आता सारंगखेडा पोलीस या चोरट्यांचा शोध घेत असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक चुनीलाल ठाकरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



