मतदार मॅपिंगचा टक्का तीन दिवसांत ४ ने वाढला; नवापूरची आघाडी तर नंदुरबारची पिछाडी कायम

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष माहिती पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेत नंदुरबार जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ लाख ५६ हजार ८६८ पैकी दहा लाख २९ हजार १८९ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे मतदारांच्या मॅपिंगचा शनिवारी संध्याकाळी असलेला ७२.०१ हा टक्का आज बुधवारी (दि. ८) ७५.८५ वर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे या कामात दुर्गम भाग असलेल्या नवापूर तालुक्याने ८३.५१ टक्क्यांसह आघाडी कायम ठेवली असून, शहरी भाग असलेला नंदुरबार तालुका ७१.५९ टक्के कामासह अजूनही जिल्ह्यात पिछाडीवरच आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या २००२ च्या मतदार यादीचे २०२४ च्या यादीशी मॅपिंग सुरू आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या टप्प्यावर हे मॅपिंग केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. अर्थात असे असले तरी जिल्ह्यात अजूनही तीन लाख २७ हजार ६७९ मतदारांचे मॅपिंग अद्यापही बाकी असल्याचे आकडेवारी सांगते.
नवापूरकरांना ‘हॅट्स ऑफ’
मतदार मॅपिंगच्या कामात नवापूर तालुक्याने जिल्ह्यात इतर तालुक्यांना खूपच मागे सोडले आहे. नवापूर तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत मतदार मॅपिंगचे तब्बल ८३.५१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या तालुक्यात तीन लाख ९४८ मतदार असून त्यापैकी दोन लाख ५१ हजार ३१७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झालेआहे. अक्कलकुवा तालुका ७४.७५ टक्क्यांसह दुसऱ्या तर शहादा तालुका ७४.७४ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एसआयआर मॅपिंगचे काम वेगात सुरू आहे. सर्वाधिक काम नवापूर तालुक्यात झाले असून, तेथील बीएलओचे काम कौतुकास्पद आहे. इतर विधानसभा मतदारसंघात मतदार मॅपिंगच्या कामाला वेग देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
– कल्पना निळ – ठुबे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), नंदुरबार



