१६ पैकी दहाच आमदार नंदुरबारला येणार, भेटीची ठिकाणेही गोपनीय, ‘इज्जतीचा पंचनामा’ होण्याच्या भीतीने प्रशासनाची धडधड वाढली

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आदिवासी विभागासाठी २०२२ ते २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विकास योजनांच्या प्रगतीची प्रत्यक्ष पाहणीसाठी विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती आजपासून (दि. ७) नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहे. चार दिवस चालणार्या या दौर्यासाठी येणार्या समितीत १६ आमदारांचा समावेश असला तरी त्यापैकी दहाच आमदार नंदुरबार जिल्ह्यात येणार आहेत. या समितीचे सदस्य जिल्ह्यात कोठे भेट देणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाची धडधड वाढली असली तरी या समितीच्या दौर्यात अर्धवट व निकृष्ट कामांचा पंचनामा होऊन खरेच काही फलित हाती लागेल का, असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वसामान्य आदिवासी जनतेला पडला आहे.
विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य असलेले आमदार याआधीच नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर येणार होते. मात्र, त्यावेळी हा दौरा रद्द झाला होता. परंतु, १६ आमदार आणि चार प्रशासकीय अधिकारी यांची ही समिती यावेळी नक्की येणार असल्याने जिल्ह्याचे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अर्थात, १६ पैकी १० आमदार जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तरीही ही समिती जिल्ह्यातील कोणत्या भागांना भेट देणार, नेमक्या कोणत्या कामांची तपासणी करणार, याबाबत अद्याप गोपनीयता ठेवण्यात आल्याने इज्जतीचा पंचनामा होण्याच्या भीतीने प्रशासनाला घाम फुटला आहे.
अर्धवट, निकृष्ट दर्जाच्या कामांची होणार तपासणी
आदिवासी विभागामार्फत करण्यात आलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सदर समिती प्रत्यक्ष कामांच्या स्थळी जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यातच जिल्ह्यात काही ठिकाणी अर्धवट आणि निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आधीच समोर आल्या आहेत. अशा कामांची समिती पाहणी करणार का, दोषींवर कारवाई होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. समितीच्या या दौर्यातून अनेक बाबी उघड होण्याच्या भीतीने प्रशासनाची धडधड वाढली असून, या दौर्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून प्रशासनाकडून अर्धवट कामे पूर्ण करतानाच निकृष्ट कामांचा दर्जा सुधारण्याचा आणि प्रलंबित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सांगण्यात येते. शुक्रवारी विविध विभागाच्या प्रमुख अधिकार्यांची बैठक घेऊन ही समिती परत मुंबईला रवाना होणार असून, या काळात ‘पितळ उघडे’ पडू नये, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तरीही समितीच्या या दौर्यातून विकास कामांबाबतचे वास्तव समोर यावे, अशी अपेक्षा नंदुरबारकर जनता व्यक्त होत आहे.
हे आहेत समितीचे सदस्य
विधिमंडळाचे सदस्य असलेले १६ आमदार आणि चार प्रशासकीय अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. दौलत दरोडा, आदित्य ठाकरे, हरिश्चंद्र मोये, मिलिंद नरोटे, केवलराम काळे, राजू तोडसाम, राजेश पाडवी, शांताराम मोरे, हिरामण खोसकर, रामदास मसराम, उमा खापरे, मंजुळा गावित, इद्रिस नायकवडी, राजेश राठोड, सुनील शिंदे, विनोद निकोले या आमदारांचा या समितीमध्ये समावेश आहे. यातील आदित्य ठाकरे यांच्यासह एकूण सहा आमदार यावेळी नंदुरबारमध्ये येणार नसल्याचे सांगण्यात येते. याशिवाय सहसचिव राजेश तारवी, समित अवर सचिव दामोदर गायकर, कक्ष अधिकारी मनोज येसनसुरे व मनोज येलवे हेही समितीसोबत जिल्ह्यात येणार आहेत.

