बंधारे आश्रमशाळेच्या अधीक्षकाला विद्यार्थ्याचा मृत्यू भोवला; तडकाफडकी निलंबन; इतर कर्मचार्यांची मात्र चौकशीच सुरू, नातेवाईकांसह संघटनांचा संताप

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आश्रमशाळेतील ब्रायन गावित या आठवीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अखेर आश्रमशाळेच्या अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक आणि चौकीदाराचीही चौकशी सुरू असून, त्यांच्यावर मात्र अद्याप काहीच कारवाई न झाल्याने नातेवाईकांसह संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. केवळ अधीक्षकांवर कारवाई करून प्रशासन नामनिराळे होऊ शकत नाही, असे नातेवाईक व या संघटनांचे म्हणणे आहे.
बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत तिसरीत शिकणार्या ब्रायन राहुल गावित या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील सेफ्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे आश्रमशाळेसह आदिवासी विकास विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
ब्रायनच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यात अवघ्या एका दिवसाच्या चौकशीनंतर आश्रमशाळेचे अधीक्षक संदीप दौलत सैंदाणे यांच्यावर दुर्लक्षपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, ब्रायनच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या शाळेतील अन्य कर्मचार्यांवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ब्रायनच्या मृत्यूला शाळा व्यवस्थापनाचा दुर्लक्षपणा जबाबदार असून, शाळेच्या अधीक्षकासह मुख्याध्यापक, चौकीदार व इतर कर्मचार्यांना निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांसह संघटनांकडून केली जात होती. मात्र, आतापर्यंत केवळ अधीक्षकावर कारवाई झाल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
आश्रमशाळांच्या व्यवस्थापनासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणार्या या गंभीर घटनेची सखोल चौकशी सध्या पोलिस व फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडून सुरू आहे. ही चौकशी येत्या तीन दिवसांत पूर्ण होऊन त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. सत्यशोधक शेतकरी सभा तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. रोशन गावित यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. ब्रायन गावितचा मृत्यू खरेच अपघाती होता की घातपात या अनुषंगाने अद्याप चौकशी झालेली नसून, दोन्ही बाजू पडताळून पहाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ब्रायन गावित या विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी. केवळ अधीक्षकाला निलंबित करणे, योग्य नाही. इतर कर्मचार्यांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.
- राजू सरदार (राज्याध्यक्ष, शासकीय आश्रमशाळा अधीक्षक संघटना)



