एसआयआर मॅपिंग : ‘कासवछाप’ बीएलओ नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या रडारवर; कारवाईची कुऱ्हाड कोसळणार, ३६ जणांचे काम ५० टक्क्यांच्या आत
नंदुरबार (भालचंद्र पिंपळवाडकर / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या कामात नंदुरबार जिल्ह्याने आघाडी घेतली असली तरी या कामाची जबाबदारी असलेल्या काही बीएलओंकडून कासववतीने काम सुरू असल्याने जिल्हा प्रशासन संतापले आहे. आता असे ३६ बीएलओ प्रशासनाच्या रडारवर आले असून, त्यांच्या कामाने ओलांडलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या २०२४ च्या या दिवशी २००२ च्या मतदार यादीचे मॅपिंग सुरू आहे. जिल्ह्यातील सहा तालुके आणि चार व विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या टप्प्यावर जिल्हा प्रशासनाकडून हे मॅपिंग सुरू आहे. या कामासाठी एकूण १ हजार ४३४ बीएलओच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून घेतले जात असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७५.८५ टक्क्यांसह तेरा लाख ५६ हजार ८६८ पैकी दहा लाख २९ हजार १८९ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. एकूण १ हजार ४३४ बीएलओपैकी जवळपास ९७.५ टक्के बीएलओ वेगाने काम करीत असून त्यामुळे मतदारांच्या मॅपिंगचा टक्का जिल्ह्यात वाढला आहे.
मात्र, सहा तालुक्यातील ३६ म्हणजेच १,४३४ पैकी अडीच टक्के काम अजूनही अतिशय संथ गतीने सुरू आहे. या बीएलओंनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या मतदारांपैकी ५० टक्केही मतदारांचे मॅपिंगही अजून पूर्ण केलेले नाही. यामध्ये शहादा तालुक्यातील सर्वाधिक ११, तळोद्यातील १०, अक्राणीतील ७, नंदुरबारमधील ५ तर अक्कलकुवा तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. कामाची गती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सूचना करू नये, त्यांचा कामाचा टक्का वाढत नसल्याने आता प्रशासन त्यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याच्या टप्प्यावर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेवटची संधी म्हणून या बीएलओंना ते काम करीत असलेल्या खात्याच्या प्रमुखांच्या माध्यमातून कामाची गती वाढविण्याच्या अखेरच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतरही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास या सर्वांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात मतदारांच्या मॅपिंग मोहिमेत ८३.५१ टक्क्यांसह आघाडीवर असलेल्या नवापूर तालुक्यातील सर्वच बीएलोंचे काम वेगात सुरू असून कारवाईची शक्यता असलेल्यांमध्ये या तालुक्यातील एका बीएलओचा समावेश नसल्याचेही या सूत्राने सांगितले.
मतदार मॅपिंग मोहिमेची गती वाढविण्यासंदर्भात सर्व बीएलोंना त्यांच्या खातेप्रमुखांच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर त्यांच्याकडून कामाची गती वाढेल अशी अपेक्षा आहे. मतदार मॅपिंगच्या कामात गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही.
– कल्पना निळ – ठुबे, – उपजिल्हाधिकारी (निवडणूक), नंदुरबार



