गुन्हेगारांचा पाठलाग होणार फास्ट; नंदुरबार पोलिस दलाला मिळाली पाच नवी वाहने, स्पेशल आयजींनी दाखवली हिरवी झेंडी

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दरी खोऱ्यातून गुन्हेगारांचा माग काढताना घाम गाळणाऱ्या नंदुरबार पोलिसांना आता गुन्हेगारांचा पाठलाग करणे आता काही अंशी सोपे होणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला शासनाने पाच नवीन वाहने उपलब्ध करून दिली असून, या वाहनांचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसीय वार्षिक निरीक्षण दौरा पार पडला. यावेळी कराड यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजांचा सखोल आढावा घेत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत गुन्हे बैठकीत मार्गदर्शनपर सूचना केल्या. जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी शासनाकडून जिल्हा पोलिस दलाला पाच नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, या नव्या वाहनांचे लोकार्पण कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तातडीने घटनास्थळी पोहोचणे तसेच जिल्हावासीयांना अधिक प्रभावी सेवा देणे जिल्हा पोलिस दलाला अधिक सोयीस्कर होणार आहे.
या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस उपाधीक्षक (मुख्यालय) अनिल पाटील, नंदुरबार व शहादा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी, पोलिस अमलदार व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.



