मक्याच्या शेतात दडून बसला, शेतकरी दिसताच तुटून पडला; नवापूर तालुक्यात बिबट्याचा थरार: जुनी सावरटमध्ये हल्ल्यात दोन गंभीर जखमी

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील जुनी सावरट परिसरात बिबट्याने गुरवार (दि. ९) सकाळपासून दहशत निर्माण केली आहे. मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने शेतात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज वसंत वसावे यांच्या मक्याच्या शेतात बिबट्या दबा धरून बसला होता. सकाळच्या सुमारास शेतात काम सुरू असताना बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कांतीलाल दत्तू गावित (५०) आणि कल्पेश दलपत वसावे (३०) हे दोघे शेतकरी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा शुभराज ग्रुपचे संचालक अजित गावित यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिंचपाडा वनक्षेत्रपाल प्राशा पगारे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले तसेच बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक सूचना दिल्या.
मात्र, बिबट्या जेरबंद होईपर्यंत भीती कायम राहणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असताना शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी ग्रामस्थ घराबाहेर पडणे टाळत असून, स्वतःच्या आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी लाठ्या-काठ्या घेऊन पहारा देत आहेत. सध्या जुनी सावरट परिसरात भीतीचे सावट कायम असून वनविभाग नेमकी कोणती ठोस पावले उचलतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
घटनेचे मुख्य मुद्दे
* जुनी सावरट परिसरात बिबट्याची दहशत
* मक्याच्या शेतात दबा धरून बसला होता बिबट्या
* दोन्ही जखमी शेतकर्यांवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
* वनक्षेत्रपाल प्राशा पगारे घटनास्थळी दाखल
* भीतीपोटी ग्रामस्थांची शेतात जाण्यास टाळाटाळ
* रब्बी पिकांना धोका, शेतीकाम ठप्प होण्याची शक्यता
* बिबट्या जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी



