नंदुरबार शहरात जीर्ण-धोकादायक तारा, सडलेले खांब, उघड्या डीपी; एआयएमआयएमचा संताप, महावितरणला निवेदन, म्हणाले, काहीतरी करा…

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील वीज पुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या लक्षात घेता ऑल इंडिया मजलिस-ए-ईत्तेहादल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईडीएल) च्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. शहरातील जीर्ण व धोकादायक वीज तारा, सडलेले खांब तसेच उघडे डीपी बॉक्स यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा यावेळी ठळकपणे मांडण्यात आला.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील अनेक भागांमध्ये वीज तारा जुने व झिजलेले असून काही ठिकाणी खांब पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच अनेक डीपी बॉक्स उघडे असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एआयएमआयएमच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात या समस्या प्रकर्षाने समोर आल्या आहेत. रज्जाक पार्क, आयबीआर पार्क परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अंदाजे ४ ते ५ नवीन वीज खांबांची तातडीची गरज असल्याचे नमूद करतानाच एल.टी. ग्राउंड परिसरातील रस्त्यावरही नवीन खांब उभारण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी खांब जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत असून ते कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सडलेले व कमजोर खांब त्वरित बदलून नवीन मजबूत खांब बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय इस्लामनगर, बागवान गल्ली ते शाहदा रोड टेकडी परिसरात जुन्या व लोळकळणाऱ्या तारांमुळे अपघाताचा धोका वाढला असून त्या काढून नवीन केबल टाकण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. शहरातील सर्व उघड्या डीपी बॉक्सना सुरक्षा कव्हर बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित भागांचे तातडीने स्ट्रक्चरल सर्वेक्षण करण्यात यावे आणि सर्वेक्षणानुसार आवश्यक ती कामे—नवीन खांब उभारणे, जुने खांब बदलणे, तारांचे नूतनीकरण व डीपी बॉक्स सुरक्षित करून त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. शहरातील वाढत्या वीज समस्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, महावितरणने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
मुख्तार बेग मिर्जा, आरिफ हमीद सैय्यद, सय्यद रफऑत हुसैन, सदाकत हुसैन (नगरसेवक, गटनेते व प्रतोद), हाफिज अब्दाल पठाण, मलिक जकरिया, आसिफ इस्माईल पिंजारी (स्वच्छता, वैद्यकीय व सर्वसाधारण समिती सदस्य), साजेदा बी मलिक अशफाक (शिक्षण समिती सदस्या, नगर परिषद नंदुरबार) आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



