गुन्हे वार्ता

शहाद्यात अवैध मद्य तस्‍करीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त, शहादा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; परप्रांतीय तरुणाच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : महाराष्‍ट्र, गुजरात आणि मध्‍यप्रदेश या तीन राज्‍यांच्‍या सीमेवर असलेल्‍या शहादा शहरात शहादा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत अवैधरित्या सुरू असलेल्‍या देशी व विदेश मद्याच्‍या तस्‍करीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी एका तरुणाच्‍या मुसक्‍या आवळत त्याच्याकडून लाखो रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ९) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास संविधान चौक, दोंडाईचा रोड येथे सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार योगेश दौलत थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी कल्याणराज चौपरी (२३, चालक, रा. सुमाप मामी मोहल्ला, मोई गल्ली, खेतीया ता. पानसेमल, जि. बडवाणी, म.प्र.) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्यास भारतीय न्‍याय संहितेच्‍या कलम ३५ (३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला. यामध्ये विविध कंपन्यांच्या बिअर बाटल्या व कॅनचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख १४ हजार ८०० रुपये आहे. तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो (क्र. एमएच १८ एजे ०९९५) ही चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाईत विविध प्रकारच्या बिअरच्या बाटल्या व कॅन बॉक्ससह जप्त करण्यात आले असून, आरोपी परवानगीशिवाय मद्य वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी शहादा पेलिस गुन्हा क्रमांक ३८४/२०२६ नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पंचनामा व व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध मद्यविक्री व वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button