खळबळजनक : चेहरा उजळण्यासाठी नंदुरबारकर वापरताहेत किडनी निकामी करणारी क्रीम; बाजारात खुलेआम विक्री, पण ‘अन्न व औषधी’चे हातावर हात!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : चेहरा गोरा करण्यासाठी नंदुरबार शहर व जिल्ह्यातील जनता चक्क किडनी निकामी करण्यासह आरोग्याला घातक क्रीम चेहर्यावर लावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे बंदी असूनही या क्रीमसह अनेक घातक सौंदर्य प्रसाधनांची नंदुरबारच्या बाजारात खुलेआम विक्री सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा घातक सौंदर्य प्रसाधनाची विक्री करू नये, अशा सूचना केमिस्ट असोसिएशनला देणार्या अन्न व औषधी प्रशासनाला आपल्या आदेशाची अंमलबजवाणी होते की नाही याची तपासणी करायला अजून वेळच मिळाला नसल्याचे वास्तव देखील समोय आले आहे.
आयातीला बंदी असूनही भारतात आणल्या जाणाऱ्या पाकिस्तानी फेरनेस क्रीम मुळे एका तरुणाची किडनी निकामी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजी नगर मध्ये उघडकीस आला होता. यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने मोहीम हाती घेत धाडसत्र अवलंबून आधी छत्रपती संभाजी नगर आणि नंतर धुळ्यातून अशा घातक सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त केला होता. नंदुरबारला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातच अशी घातक सौंदर्य प्रसाधने सापडल्यानंतर नंदुरबारच्या बाजारपेठेतही घातक सौंदर्यप्रसाधने विकली तर जात नाहीत ना अशी शंका व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासनाने जिल्हा केमिस्ट असोसिएशनला पत्र देऊन या घातक क्रीम आणि औषधांची विक्री न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ‘गोरी’ नाव असलेल्या आरोग्यास घातक क्रीमची विक्री केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेशवजा पत्र अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त अश्विनी जमादार यांनी जिल्हा केमिस्ट असोसिएशनला काही दिवसांपूर्वी दिले होते. यानंतर या विभागाने आपल्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही आणि जिल्ह्यात पाकिस्तानी बनावटीच्या घातक क्रीम व आरोग्यासाठी हानिकारक औषधांची विक्री होते की नाही याच्या तपासणीची मोहीम हाती घेणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचे समोर आले आहे.
‘कुणीही यावे अन घेऊन जावे’
‘गोरी’सह त्वचा उजळ करणाऱ्या विविध क्रीम या ‘शेड्युल्ड ड्रग’ श्रेणीत येतात. त्यांची विक्री त्वचारोग तज्ज्ञांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसारच करणे बंधनकारक आहे. मात्र नंदुरबार शहरात केमिस्ट शिवाय कॉस्मेटिक क्रीमची विक्री करणारी अनेक दुकाने असून, त्यातील बहुतांशजण त्वचा उजळ करणाऱ्या क्रीमची विक्री करीत आहेत. विशेषता नंदुरबार शहरातील मंगळ बाजार, सिंधी कॉलनी, बसस्थानक परिसरातील डीएसके मार्केट या ठिकाणी चेहरा गोऱ्या करणाऱ्या आणि चेहऱ्यावरील डाग मिटविणाऱ्या क्रीम सहज उपलब्ध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे कॉस्मेटिक वस्तू विक्रेत्यांना अशा क्रीम विक्रीचे अधिकार नसताना ते खुलेआम पद्धतीने त्यांची विक्री करीत असून, या क्रीमच्या वापरामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांची कमतरता
अन्न व औषधी प्रशासन विभागात सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचीही माहिती पुढे आली आहे. अश्विनी जमादार या अन्न व औषधी प्रशासनाच्या सहायक आयुक्त असून त्यांच्याकडे सध्या सहायक आयुक्त पदासह औषध निरीक्षक या पदाचाही भार आहे.
आरोग्याला मोठा धोका
छत्रपती संभाजीनगर व धुळ्यात जप्त केलेली सौंदर्य प्रसाधने आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या क्रीम व साबणांमध्ये ‘इथिलिन ग्लायकोल’सह ‘कार्सिनोजेनिक’ घटक आहेत. हे घटक त्वचेवाटे माणसाच्या शरीरात प्रवेश करून थेट मूत्रपिंड (किडनी) कायमचा निकामी होण्याचा धोका असतो. याशिवायही मानवी शरीरातील अन्य अवयवांवर देखील हे घटक विपरित परिणाम करण्याची शक्यता असते.
सीमावर्ती भागांतून आयात?
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, नवापूर व शहादा हे तीन तालुके महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारी आहेत. शिवाय शहादा तालुक्याची हद्द मध्यप्रदेशला देखील लागून आहे. दोन राज्यांना जोडणारी गावे व तालुके तस्करीसाठी ‘सोपी’ पडत असल्याने या ठिकाणी तस्करांचे अड्डे असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. विशेषत: या तिन्ही तालुक्यांत सीमावर्ती भागात अनेकदा शस्रे व मद्य तस्करीचे गुन्हे नोंद झाले आहेत. याच पद्धतीने तस्करी मार्गाने नंदुरबार जिल्ह्यातही पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आली नाहीत ना, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.



