नंदुरबार जिल्हा

दे दणादण : शहादा बसस्थानकात विद्यार्थिनींच्‍या दोन गटांत तुफान राडा; महिलेनेही एन्ट्रीसह घेतले हात धुवून

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थिनींच्या दोन गटांत झालेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची घटना घडली. या वादात एका महिलेने हस्तक्षेप करत विद्यार्थिनीला मारहाण केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची बसस्थानकात मोठी गर्दी होती. यावेळी किरकोळ कारणावरून दोन विद्यार्थिनींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही क्षणातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान एका महिलेने या वादात उडी घेतली आणि एका विद्यार्थिनीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
महिलेचा आक्रमक पवित्रा पाहून परिसरातील प्रवासी व नागरिक काही काळ स्तब्ध झाले. परिस्थिती चिघळत असताना मध्यस्थी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर एका जागरूक नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच गोंधळ थांबला आणि संबंधितांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी सर्व संबंधितांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या पालकांना व नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर सामोपचाराने चर्चा घडवून आणत प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र, वादाचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. अशा वेळी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तसेच बसस्थानकात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. कॅमेरे सुरू असतील, तर संबंधित घटनेचे फुटेज तपासून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button