नंदुरबार जिल्हा

‘पेसां’तर्गत कायम करण्‍यासाठी मानधनावरील शिक्षकांनी उगारली आंदोलनरूपी ‘छडी’; जि.प.समोर धरणे आंदोलन सुरू

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्था मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पेसा (पीईएसए) कायदा प्रत्यक्षात मात्र दुर्लक्षित राहिला आहे. पेसाअंतर्गत शिक्षक भरती रखडली असून, कायम तत्त्‍वावर नियुक्‍तीसाठी पात्र असूनही मानधन तत्त्‍वावर काम करावे लागत असलेल्‍या शिक्षकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या शिक्षकांनी अखेर जिल्‍हा परिषदेपुढे धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आदिवासी भागांमध्ये आजही शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून, अनेक शाळांमध्ये नियमित अध्यापन होत नाही. परिणामी, शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असे या पात्र उमेदवारांचे म्हणणे आहे.
सध्या २२९ उमेदवार मानधन तत्त्वावर आदिवासी भागात कार्यरत आहेत. या उमेदवारांनी प्रत्यक्ष काम करून आपली क्षमता सिद्ध केली असून, भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्याने व सहानुभूतीपूर्वक संधी देण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. अनेक उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून भरतीची वाट पाहत आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांनी इशारा दिला आहे की, शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या..
पेसा अंतर्गत शिक्षक भरती तात्काळ जाहीर करावी
रिक्त पदांची अचूक संख्या जाहीर करावी
भरती प्रक्रियेचे स्पष्ट वेळापत्रक द्यावे
स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे
मानधन तत्त्वावर कार्यरत २२९ उमेदवारांना न्याय द्यावा

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button