महाराष्ट्र

‘ब्रायन गावित’ची पुनरावृत्ती झाल्‍यास खबरदार; विधिमंडळ समिती सदस्‍यांची आदिवासी विभागाच्‍या अधिकार्‍यांना तंबी, शासकीय आश्रमशाळेतील मृत्यूच्‍या चौकशीला वेग

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्याला हादरवून सोडणार्‍या नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेची प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्‍य विधिमंडळाच्‍या अनुसूचित जमाती कल्याण समितीने थेट सोनखडका गावात जाऊन मृत विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत समितीने घटनेची सखोल माहिती जाणून घेत कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती कोणत्याही आश्रमशाळेत होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना कडक निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही समितीने दिला.
समितीचे अध्यक्ष आमदार दौलतराव दरोडा, आ. राजेश पाडवी, आ. हिरामण खोसकर आणि आ. मंजुळा गावित आदींनी ब्रायनचे आई-वडील तसेच मोठा भाऊ स्‍टिव्‍हन यांच्‍याशी संवाद साधला. कुटुंबीयांनी संपूर्ण घटनाक्रम समितीसमोर मांडला. याचवेळी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांतील कलमे आणि सुरू असलेल्या तपासाची माहितीही समितीने बारकाईने जाणून घेतली.
कुटुंबियांना धनादेश सुपूर्द
कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला, तर समितीच्या वतीनेही अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात आली. “या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे ठाम आश्‍वासनही समितीने यावेळी दिले.
अन्‍य उपक्रमांनाही भेटी
याच दौऱ्यात समितीने सोनकडखा येथील विविध शासकीय योजनांचीही पाहणी केली. आदिवासी विकास विभागांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या गाईंची तपासणी करीत दूध उत्पादनाची माहिती घेतली. तसेच शबरी घरकुल योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना आदेश मिळूनही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याचे उघड झाल्याने समितीने त्याची गंभीर दखल घेतली. लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी झाली आहे का, याची चौकशी करीत योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या पाहणी दौऱ्यात समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button