गुजरात वन विभागाने पिंजरा लावला अन् त्यात बिबट्या अडकला; नवापुरातील देवमोगराकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास, तालुक्यात मात्र दहशत कायम

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील देवमोगरा शिवार आणि महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर गुजरात वन विभागाच्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि. ९) अडकला. ही कारवाई यशस्वी ठरल्याने परिसरातील रहिवाशांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अर्थात, गुरुवारीच तालुक्यातीलच जुनी सावरट भागात मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने दोन शेतकर्यांवर हल्ला केल्याने तालुक्यात असलेली बिबट्याची दहशत अजून कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देवमोगरा परिसरात बिबट्याचा धुडगुस सुरू होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करीत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. भितीपोटी रात्री शेतात जाणेही धोकादायक बनले होते. ग्रामस्थांच्या मागणीनंतर अखेर महाराष्ट्र व गुजरात वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सीमाभागात पिंजरे लावले होते. त्यापैकी गुजरात वन विभागाच्या पिंजर्यात एक बिबट्या अडकला.
दरम्यान, पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली . मात्र, या घटनेनंतरही नवापूर तालुक्यातील इतर अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल १० ते २० किलोमीटरच्या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील वन विभागानेही तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि बिबट्यांना सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



