पत्नी, मुलाचा ताबा मागणाऱ्या जावयासह तिघांवर तुटून पडली सासरची मंडळी; धडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना, ६ जणांवर गुन्हा

मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मला माझी पत्नी आणि मुलगा ताब्यात द्या, अशी मागणी घेऊन गेलेल्या युवकासह अन्य तिघांना सासऱ्यासह एकूण सहा जणांनी तुफान मारहाण केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील वेहगी येथील आमराई पाडा या ठिकाणी घडली. याप्रकरणी एकूण सहा जणांवर मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील पानबारी येथील जातऱ्या चमऱ्या वसावे (२९) या शेतकऱ्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, काही कारणामुळे त्याची पत्नी मुलासह माहेरी निघून गेली होती. बरेच दिवस ती तिथे असल्याने जातऱ्या बुधवारी (दि. ८) पत्नी व मुलाला परत आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत सुभाष दिवाल्या वसावे व सुरसिंग दाज्या वसावे (सर्व रा. पानबारी, ता. धडगाव) हेही होते.
जातऱ्या याने सासरा सिपा ईरमा वळवी (रा. असली, ता. धडगाव) याची भेट घेऊन मला माझी पत्नी व मुलगा ताब्यात द्या अशी मागणी केली. मात्र याचा राग येऊन सिपा वळवी याच्यासह इतर पाच जणांनी जातऱ्या व त्याच्यासोबतच्या दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह लाकडी डेंगाऱ्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी जातऱ्या वसावे याच्या तक्रारीवरून सिपा ईरमा वळवी (सासरा, रा. असली, ता. धडगाव), लाल्या दिल्या पाडवी, दिल्या आमश्या पाडवी, मुकेश पारता पाडवी, धिमा कर्मा वसावे, दिवाळी कागडा वसावे (सर्व रा. वेगी, ता. अक्कलकुवा) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ वनसिंग पाडवी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



