भरदिवसा शासकीय तांदळावर चोरट्यांचा डल्ला; नंदुरबारच्या गोदामाबाहेरून रिक्षातून पळवला तीन क्विंटल माल

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा ) : नंदुरबार शहरात चोरीच्या घटना थांबायला तयार नसून, आता चोरट्यांच्या टोळीने थेट शासकीय धान्य गोदामालाच लक्ष्य केले आहे. चोरट्यांनी शहरातील सरकारी धान्य गोदामाच्या परिसरातून तब्बल तीन क्विंटल तांदळावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील नळवा रोडवरील बाहेरपुरा भागात शासकीय धान्य गोदाम आहे. या ठिकाणी शासनाने खरेदी केलेले विविध धान्य साठवून ठेवण्यात येते. या गोदामात ठेवण्यासाठी एका ट्रक मधून तांदळाचे कट्टे आणण्यात आले होते. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा ट्रक गोदामाच्या बाहेर उभा असताना रिक्षाचालक खलौल अब्जल अहमद मोमीन (४४, रा. मन्यार मोहल्ला, मरगद मशीदच्या मागे, नंदुरबार) याच्यासह तिघांची टोळी तेथे पोहोचली. या सर्वांनी ट्रकमधील प्रत्येकी ५० किलो वजनाचे सुमारे १३ हजार रुपये किमतीचे तांदळाचे सहा कट्टे एमएच ४३ बीई १३८६ रिक्षात भरण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच गोदामातील कर्मचारी रितेश याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता चोरटे तांदळाच्या गोण्या रिक्षात भरून पळून गेले.
याप्रकरणी शासकीय धान्य वाहतूक ठेकेदार अजित कुमार नंदलाल मंगलानी यांच्या तक्रारीवरून खलौल अब्जल अहमद मोमीन याच्यासह त्याच्या तीन सहकाऱ्यांवर (नावे माहिती नाहीत) नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर गुले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



