तोरणमाळच्या विनदेव पाड्यावर प्रकटली देवमोगरा माता; घरासाठी खोदकाम करताना आढळली मूर्ती, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या (ता. धडगाव, जि. नंदुरबार) विनदेव पाडा येथे घर बांधणीसाठी खोदकाम सुरू असताना देवमोगरा मातेची मूर्ती सापडली आहे. या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. तालुकाभरातून शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
तोरणमाळच्या विनदेव पाडा येथे लशा चौधरी हे नवीन घराच्या बांधकामासाठी खोदकाम करीत होते. काही फूट जमीन खोदल्यानंतर अचानक त्या ठिकाणी देवमोगरा मातेची धातूची मूर्ती खोदकाम करणाऱ्या कामगारांना दिसून आली. त्यांनी तातडीने घर मालकाला ही माहिती दिली. देवीची मूर्ती सापडल्याची बातमी लगोलग गावभर आणि तेथून तालुक्यात पसरली. काहींनी त्या ठिकाणी पोहोचून मूर्तीचे फोटो काढले आणि व्हिडिओ चित्रीकरणही केले. काही वेळातच हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरले. यानंतर मूर्तीच्या दर्शनासाठी संबंधित ठिकाणी भाविक गर्दी करीत असून, मूर्ती सापडलेल्या ठिकाणी मंदिर उभे करण्याची मागणी देवमोगरा मातेच्या भक्तांकडून केली जात आहे.
पुरातत्त्व विभाग अनभिज्ञच
विनदेव पाडा येथे तीन दिवसांपूर्वी देवमोगरा मातेची मूर्ती आढळल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही आतापर्यंत पुरातत्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेल नाहीत. त्यामुळे ही मूर्ती किती प्राचीन आहे याबद्दल अद्याप तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे तोरणमाळ परिसरामध्ये याआधीही अनेकदा शिळा आणि प्राचीन वस्तू सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.



