गाजावाजा भारी पण लसीकरणाला मिळेना उभारी; आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या ४ टक्के मुलींनी घेतली एचपीव्ही लस!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भविष्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्यापासून बचाव करणारी एचपीव्ही लस टोचून घेण्यास नंदुरबार जिल्ह्यातील १४ व १५ वयोगटातील मुलींकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये जिल्ह्यात अवघ्या चार टक्के मुलींचे एचपीव्ही लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे. अर्थात लसीकरणाचा टक्का कमी होण्यास संबंधित वयोगटातील मुलींपेक्षा त्यांच्या पालकांमध्ये असलेली भीती आणि गैरसमज कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने १४ व १५ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही प्लस टोचण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शासकीय तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील संबंधित वयोगटातील मुलींना ही लस दिली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शाळांच्या माध्यमातून संबंधित वयोगटातील मुलींवर पोहोचण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. मात्र, जिल्ह्यात या मोहिमेला आतापर्यंत तरी फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्हा आरोग्य विभागाने हार मानलेली नसून जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना पत्र देऊन पालकांची सहमती घेणे पालक बैठकांचे आयोजन करणे आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. या माध्यमातून या लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तथापि याआधी कोरोना लसीबाबत पसरलेली अफवा आणि दुष्परिणाम याची भीती अद्यापही लोकांमध्ये कायम आहे. याच अनुषंगाने आता एचपीव्ही लसीबाबतही पालकांमध्ये गैरसमज असून, त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलींना लस देण्यास धजावत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. याचमुळे शाळांकडून पालकांच्या प्रबोधनासाठी सुरू असलेले प्रयत्नही तोकडे पडत असून, परिणामी मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात सध्याच्या घडीला १४ व १५ वयोगटातील एकूण १३ हजार ४९० मुली असून, त्यापैकी केवळ ५६६ मुलींना आतापर्यंत ही लस देण्यात आली आहे.



