भीषण अपघात : दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् थेट खड्ड्यात कोसळले दोन मित्र; एक जागीच ठार, दुसऱ्याचा मृत्यूशी लढा
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या युवकांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळून मागे बसलेल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना धडगाव ते बिलगाव रस्त्यावर घडली. या अपघातात गाडी चालवणारा मित्र गंभीर जखमी झाला असून, त्याचा सध्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी लढा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास विजय पावरा (१६, रा. शेलकुईचा तिसफडीवाडा, ता. धडगाव) आणि अरविंद विजय पावरा (१९, रा. धनाजे बु., ता. धडगाव) हे दोन मित्र शुक्रवारी (दि. १०) सकाळी एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. तेथून अन्य एकाची दुचाकी घेऊन घेऊन धडगाव ते बिलगाव रस्त्याने निघाले असता दुपारी एक वाजेच्या सुमारास शेलकुई गावाच्या शिवारात चिकलटी फाट्याजवळ गाडीचालक अरविंद पावरा याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आतच त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली.
या भीषण अपघातात गाडीवर मागे बसलेला कैलास पावरा याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अरविंदलाही जबर मार लागला. काही वेळानंतर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने धडगाव पोलिसांना ही घटना कळवली. अवघ्या ७ कि. मी. अंतरावर असलेल्या धडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कैलास याचा मृतदेह आणि जखमी अवस्थेतील अरविंदला धडगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अरविंदला तातडीने नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी पिंट्या विजय पावरा यांच्या तक्रारीवरून हयगयीने वाहन चालविल्याबद्दल अरविंद पावरा याच्यावर धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस हवालदार हरिलाल कोकणी करीत आहेत.



