मुख्य बातम्या

मोठी बातमी : छगन भुजबळ थोडक्‍यात बचावले; पायलटने हेलिकॉप्टर भलतीकडेच उतरविले, पुण्यातील धक्‍कादायक प्रकार

पुणे (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना ताजी असतानाच आता  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुण्यात सुदैवाने एका मोठ्या अपघातातून बचावले आहेत. भुजबळ यांचे हेलिकॉप्टर पायलटने चुकीने नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी दुसरीकडेच लँड केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुदैवाने या घटनेत भुजबळ यांच्यासह कुणालाही जखम झालेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री छगन भुजबळ महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे एका शाळेच्‍या उद्‍घाटनासाठी चालले होते. तेथे कार्यक्रम स्थळाच्या बाजूलाच स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. भुजबळ यांचे हेलिकॉप्टर खानवडी गावात पोहोचल्यानंतर पायलटला तेथे बाजूलाच असलेल्या कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने मूळ हेलिपॅडषवजी या मोकळ्या जागेवरच हेलिकॉप्टर उतरवले. भुजबळ यांचे हेलिकॉप्टर भलत्याच ठिकाणी लँड झाल्यामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडाला होता. शिवाय सुरक्षा यंत्रणांची ही धावपळ उडाली.
सुदैवाने या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. हेलिकॉप्टर लँड झाले त्यावेळी कार पार्किंग क्षेत्रात काही वाहने उभी होती. मात्र या वाहनांचे नुकसान झालेले नाही किंवा कुणाला दुखापत देखील झाली नाही. पोलिसांनी तातडीने हेलिकॉप्टर लँड झालेल्या ठिकाणाकडे धाव घेत पायलटशी संपर्क साधला. यानंतर ते हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आले.
दरम्यान पायलटच्या या चुकीबद्दल स्थानिक रहिवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. तर या घटनेनंतर सुरक्षित असलेले छगन भुजबळ नियोजनानुसार पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. नियोजित ठिकाण माहिती असूनही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्याची चूक पायलट करून झालीच कशी, असा प्रश्न करीत स्थानिक रहिवाशांनी लोकवस्तीच्या जवळ अशा पद्धतीने हेलिकॉप्टर उतरवणे मोठ्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखे ठरले असते, अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.
चौकशी होणार
दरम्यान, या घटनेची प्रशासनाकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हेलिपॅड स्पष्ट दिसत असूनही पायलट कडून नेमकी चूक कशी झाली, हेलिकॉप्टर उतरवण्यात काही तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button