नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ‘बाल कवच’ उपक्रम; ‘कर्तव्य’, ‘रोटरी’कडून नवजात बालकांसाठी ‘मायेची ऊब’ किट वितरण

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट उपक्रम) : नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे ‘बाल कवच’ या सामाजिक उपक्रमांतर्गत नवजात बालकांना ‘मायेची ऊब’ किटचे वितरण करण्यात आले. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते या किटचे वितरण पार पडले. नवजात बालकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कर्तव्य फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या प्रत्येक महिलेला डिस्चार्जच्या दिवशी हे किट विनामूल्य देण्याची विशेष सोय या उपक्रमात करण्यात आली आहे.
या ‘मायेची ऊब’ किटमध्ये नवजात बालकांसाठी आवश्यक असलेल्या गादी, तकिया, मच्छरदाणी, कपडे (ड्रेस) आणि ब्लँकेट अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील नवजात बालकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत असून समाजातील विविध घटकांकडून त्याचे कौतुक होत आहे.
यावेळी नगरसेवक हिरालाल चौधरी, प्रतीक जैन, प्रितेश बांगड, आकाश बेदमुथा, शैलेश मुलानी, महेश रघुवंशी, विजय बांगड, राहुल पाटील, राजेश्वर चौधरी तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
* कर्तव्य फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांचा संयुक्त पुढाकार
* प्रत्येक प्रसूतीनंतर महिलेला डिस्चार्जच्या दिवशी किट उपलब्ध
* किटमध्ये गादी, तकिया, मच्छरदाणी, कपडे व ब्लँकेटचा समावेश
* गरजू कुटुंबांना मोठा आधार, बालकांच्या आरोग्य संरक्षणास मदत



