बिग ब्रेकिंग न्यूज : नवापूर स्थानकात बसने महिलेला चिरडले; रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली येऊन ठार, नातही जखमी; दुपारी १२.३० वाजता घडला थरार
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर बस स्थानकामध्ये शनिवारी भर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. बस रिव्हर्स घेताना चालकाने लक्ष न दिल्याने या बसच्या मागच्या चाकाखाली येऊन एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिची नात जखमी झाली. कमुबाई गोठाऱ्या गावित (रा. डोकारे, ता. नवापूर) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, याप्रकरणी बस चालक नितीन धनराज भामरे (शहादा डेपो, रा. मेहरगाव, ता. व जि. धुळे) याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा आजाराची शहादा – वापी (गुजरात) बस (एमएच १४ एमएच २३१०) शनिवारी (दि. ११) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नवापूर बस स्थानकात पोहोचली. बसस्थानकाला वळसा घालून ही बस आगारात आल्यानंतर चालक नितीन भामरे बस रिव्हर्स घेऊन प्लॅटफॉर्मवर लावत होता. याच वेळी बसस्थानकावर हिरकणी कक्षासमोर आपल्या बसची वाट पाहत असलेल्या कमुबाई गावित व तिची १५ वर्षीय नात (बहिणीच्या मुलीची मुलगी) नीतीक्षा या दोघींना या बसचा धक्का लागला. यामुळे कमुबाई जागीच कोसळली, तर नीतीक्षा थोडीशी बाजूला झाली.
अनेकांनी हे दृश्य पाहून बस चालकाला बस थांबवण्यासाठी इशारा केला. मात्र, त्याकडे त्याचे लक्ष नव्हते. भामरे याने तशीच गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केल्याने कमुबाई मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाली. बसच्या वाहकाने तातडीने रिक्षा बोलावून कमुबाई व नीतीक्षा यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून कमुबाईला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बस स्थानकात दाखल झालेल्या नवापूर पोलिसांनी घटनेची दखल घेत शैलेश वसंत वळवी यांच्या तक्रारीवरून बस चालक नितीन भामरे याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली.
नातेवाईक, गावकर्यांचा संताप
घटनेची माहिती मिळताच कमुबाई गावित यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी कमवायच्या अपघाती मृत्यूबद्दल संताप व्यक्त करीत आक्रोश सुरू केला. बसचालकावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी हे नातेवाईक व घटनेचे प्रत्यक्षदर्शी प्रवासी करीत होते. बस चालकाला अटक होऊन कमुबाई गावित यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र त्यांच्या कुटुंबीयांसह डोकारे ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तणाव निवळला.



