गुन्हे वार्ता

विसरवाडीत ‘पुष्‍पा’ स्‍टाईल तस्‍करीचा पर्दाफाश : भाजीच्या कॅरेटमध्‍ये सापडले कोल्‍हे, तीतर अन्‌ पोपट; एलसीबी, स्‍थानिक पोलिस व वनविभागाची संयुक्‍त कारवाई

नवापूर / शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ‘पुष्पा’ चित्रपटातील स्टाईलची आठवण करून देणाऱ्या तस्‍करीचा नंदुरबार पोलिसांच्‍या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), वनविभाग आणि विसरवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चक्‍क भाजीच्या कॅरेटमध्‍ये कोल्‍हा, तीतर आणि जंगली पोपट भरून गुजरातकडे घेऊन जाणार्‍या पाच जणांच्‍या टोळीला गजाआड करण्‍यात आले असून, या कारवाईत पाच भारतीय कोल्ह्यांसह जंगली पोपट आणि तीतर जप्त करण्यात आले.
नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या सुरत–अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडीजवळ आयशर टेम्पो (एमएच ४१ एलयू २३५२) मधून वन्यप्राण्यांची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारे पोलिसांनी विसरवाडी गावाजवळ सापळा रचून हा आयशर ट्रक अडवला. तपासणी, केल्‍यावर या वाहनाच्या मागील भागात भाजीपाला ठेवण्यासाठी वापरले जाणारे कॅरेट्स ठेवून त्याच्या आड लोखंडी जाळी व पिंजऱ्यांमध्ये वन्य प्राणी आणि पक्षी लपवून नेले जात असल्याचे आढळले.
या कारवाईत पोलिसांनी ५ भारतीय कोल्हे, १९० तीतर आणि ९९ जंगली पोपट (अलेक्झांड्रिन प्रजाती) जप्त केले. हे सर्व प्राणी अत्यंत अमानुष परिस्थितीत कोंडून ठेवण्यात आले होते. जप्त केलेले वन्यजीव आणि वाहन अशा एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाच जणांना बेड्या
या प्रकरणी पोलिसांनी शहजाद अहमद अतिक अहमद (४७), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (३२), शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (२४) मोहम्मद हुसेन व मोहम्मद मुस्तफा उर्फ गुलाम (सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक) यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्‍यांना बेड्या ठोकण्‍यात आल्‍या. हे सर्वजण मालेगाव येथून गुजरातमधील वडोदरा येथे वन्यजीवांची तस्करी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त पंचनामा करून जप्त केलेल्या प्राणी-पक्ष्यांना सुरक्षित ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्‍ह्यांसह दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांची तस्करी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी केली जात होती, याचा तपास सुरू असून या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार पोलिसांच्या या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button