मुख्य बातम्या

खर्चाची चिंता सोडा : किचकट दुखण्यावरील महागड्या उपचारांसाठीही आता सरकारचा मदतीचा हात; ‘सार्वजनिक आरोग्य’कडून नवी कार्यपद्धती जाहीर!

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना यापुढे दुर्धर आजारांवरील उपचारासाठी खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. कारण आता पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी देखील शासकीय योजनेतून मदत मिळणार आहे.
राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले प्रधानमंत्री जन आरोग्य आणि आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनांचा विस्तार केला असून,  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनांच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण देणारा शासन निर्णय जारी केला आहे. या योजनांच्या विस्तारामुळे आता रुग्णांना हृदय, यकृत, फुफ्फुस यासह अन्य अवयवांचे प्रत्यारोपण, कृत्रिम प्रत्यारोपण, बोन मॅरो, ट्रान्सप्लांट, हृदय व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन आधी उपचारांसाठी शासनाची मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे नव्या कार्यपद्धतीनुसार या योजनांचा लाभ घेताना रुग्णांना होणारा त्रासही वाचणार आहे. या योजनेत रुग्णालयात रुग्णाच्या वतीने अर्ज दाखल करणार असून, हा प्रस्ताव योग्य कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन प्रणाली विकसित होईपर्यंत या योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी समिती त्याची तपासणी करून प्रस्ताव पुढे पाठवेल. हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वैद्यकीय व निधी मंजुरी समिती, वैद्यकीय पडताळणी व निधी मंजुरीसाठी दर शुक्रवारी बैठक होईल. यानंतर शेवटच्या टप्प्यात विशेष उपचार सहाय्यता व सक्षमीकरण समिती या प्रस्तावांना अंतिम मंजुरी देईल.
या आहेत अटी व निकष
* रुग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
* रुग्णाकडे आधार कार्ड व रेशन कार्ड असणे आवश्यक.
* मंजूर निधी रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा होईल.
* रुग्णाला रोख पैसे देण्याची आवश्यकता नाही.
* सर्व प्रक्रिया ऑनलाईन असेल.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button