गुन्हे वार्ता

खून केला, पसार झाले अन्‌ पडक्या इमारतीत लपून बसले, पण एलसीबीच्या तावडीत सापडलेच; नंदुरबारमधील बार मॅनेजरच्या खुन्यांना २४ तासांच्या आत बेड्या!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील हॉटेल मंदाकिनीच्या व्यवस्थापकाच्या खुनाचा उलगडा २४ तासांच्या आत करण्यात नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. खून केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी या बिअरबारमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सागर रमेश जाधव (कैकाडी) याचा शनिवारी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान बारमध्ये घुसून पाच जणांनी धारदार शस्त्रांचे वार करून खून केला होता. यावेळी सागरवर तलवारीसह अन्य शस्त्रांनी वार करण्यात आले होते. यातील काही वार वर्मी बसल्याने गंभीर जखमी झालेल्या सागरचा नंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
याप्रकरणी सागरचा मित्र कुणाल मराठे याने नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. ‘आमचा मित्र जय वळवी याच्या खुनाच्या गुन्ह्यात तुझा मालक जेलमध्ये असताना तू हॉटेल चालू ठेवण्याची हिंमत का केली, तुझा हॉटेल चालू ठेवण्याचा काय संबंध’, असा जाब विचारत पाच जणांनी सागरवर हॉटेलात घुसून वार केले होते, असे कुणाल याने फिर्यादीत म्हटले होते. यावरून उदयसिंग उर्फ विकी राजूसिंग राजपूत (२७, रा. साईबाबा मंदिराजवळ, परदेशीपुरा, नंदुरबार), कैलास रमेश पाडवी (३०, रा. वाघोदा, ता. व जि. नंदुरबार), निलेश उर्फ बंटी वसंत चौधरी (२७, कोहिनूर टाकीजवळ, नंदुरबार), दशरथ हिरालाल मुसळदे (२९, रा. पातोंडा, ता. व जि. नंदुरबार) आणि एक व्यक्ती अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एसपींचे निर्देश अन्‌ एलसीबीची कारवाई
शहरात घडलेल्या या निर्दयी खुनाच्‍या घटनेनंतर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत एलसीबीला आरोपींचा तत्काळ माग काढण्याचे निर्देश दिले होते. यानंतर एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी कुणाच्या घटनेचा चोहोबाजूंनी तपास सुरू केला. याच दरम्यान सागर जाधवचा खून करून फरार झालेले आरोपी शहरापासून काही अंतरावर असलेल्या पातोंडा (ता. व जि. नंदुरबार) येथील एका शिवारातील जुन्या पडक्या इमारतीमध्ये दडून बसल्याची माहिती खबऱ्याने एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली. पाटील यांनी तातडीने एलसीबीच्या पथकाला संबंधित ठिकाणी पाठवले या पथकाने सापळा रचून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, चौकशीअंती आरोपींनी कुणाची कबुली दिली असून त्यांना उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button