नंदुरबारमध्ये रक्तरंजित थरार: बार मॅनेजर तरुणाचा धारदार शस्त्रांनी खून; पाच जणांनी हॉटेलात घुसून केला खेळ खल्लास!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारकरांना शनिवारी (दि. ११) रात्री खुनाचा थरार अनुभवायला मिळाला. हातात धारदार शस्त्र घेऊन आलेल्या पाच जणांनी हॉटेल मंदाकिनी या बिअर बारमध्ये घुसून येथील व्यवस्थापकाची हत्या केली. या खुनाचा संदर्भ काही महिन्यांपूर्वी झालेल्या जयंत दळवी हत्या प्रकरणाशी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सागर रमेश जाधव (कैकाडी, वय २५, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, खुनानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर जाधव हा नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. शनिवारी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास सागर नेहमीप्रमाणे हॉटेलच्या काउंटरवर नियमित कामकाज पाहत होता. याचवेळी धारदार शस्त्रे हाती घेतलेल्या पाच जणांच्या टोळीने हॉटेलवर प्रवेश केला आणि कुणाला काही कळण्याच्या आतच त्यांनी सागर वर हल्लाबोल केला. यातील काही घाव वर्मी बसल्याने सागर रक्तबंबाळ झाला. अत्यंत गंभीर जखमी असूनही सागर त्याच अवस्थेत हॉटेलच्या बाहेर पडून सैरावैरा जाऊ लागला. याच वेळी त्याचा मित्र कुणाल मराठे याने त्याला पाहून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास सागरचा मृत्यू झाला.
नंतर कुणाल मराठे याने हल्लेखोरांविरोधात नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. मंदाकिनी हॉटेलचे मालक हे जय वळवी यांच्या कुणाच्या गुन्हा कारागृहात आहेत. असे असताना तू हॉटेल कसे चालू ठेवले, हॉटेल चालू ठेवण्याचा तुझा संबंध काय, अशी विचारणा करीत कैलास पाडवी (रा. वाघोदा, नंदुरबार), विकी राजपूत (रा. परदेशीपुरा, नंदुरबार), दीपक ठाकरे (रा. नंदुरबार), निलेश उर्फ बंटी वसंत चौधरी (रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) आणि त्यांच्यासोबत असलेला अनोळखी मुलगा अशा पाच जणांनी लाकडी दांडा, स्कॅनर मशीन, तलवार व अन्य धारदार शस्त्रांनी सागरवर पोटात, हातावर, डोक्यावर वार करून त्याची हत्या केल्याचे कुणाल मराठे याने फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिस अधीक्षक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी गाव घेतली. पाठोपाठ पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हॉटेल मंदाकिनी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान सध्या पाचही आरोपी फराळ झाली असून पोलीस अधीक्षकांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या खुनाचा तपास जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या या घटनेचा अधिक तपास संदीप पाटील हे करीत आहेत.



