ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अंतिम श्वास

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गेली सहा वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी रविवारी (दि. १२) अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आशाताईंना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. आज रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आशाताईंचे पुत्र आनंद भोसले यांनी रुग्णालयाबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधताना ही दुःखद बातमी जाहीर केली. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीची व्हर्सटाईल गायिका अशी ओळख निर्माण करून तब्बल सहा दशके वेगवेगळ्या भाषांतील गीतांना आवाज देणाऱ्या आशाताई यांनी मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगु आणि हिंदी अशा विविध भाषांमधील गीतांना आवाज दिला होता. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन ओ. पी. नय्यर, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक गीतांना आवाज देत शेकडो गाणी अजरामर केली.
दरम्यान, आशाताईंच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून, सकाळी ११ वाजेपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी सुरू झाली आहे. आशाताईंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले असून, दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


