ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक; रूग्णालयात दाखल, आजारासह उपचारांबाबत प्रचंड गुप्तता

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. आशा भोसले यांच्यावर मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या आजारासह त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत रुग्णालयाकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे.
शनिवारी सायंकाळी उशिरा ९२ वर्षीय आशा भोसले यांच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सून आणि नात जनाई भोसले या होत्या. आशा भोसले यांना छातीचा संसर्ग आणि हृदयविकाराशी संबंधित त्रास जाणवत असल्याने प्रारंभी त्यांना आकस्मिक उपचार विभागात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. इंटर्नल मेडिसिनतज्ज्ञ डॉ. प्रतीत समदानी व अन्य हृदयविकार तज्ज्ञांच्या देखरेखी खाली भोसले यांच्यावर तूर्तास उपचार सुरू आहेत.
आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री उशिरा राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची व सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. दरम्यान, भोसले यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत रुग्णालयाकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत असून आज (रविवार) हेल्थ बुलेटीन काढून भोसले यांच्यावरील उपचाराची माहिती दिली जाईल, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
दुसरीकडे, जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आशा भोसले यांना होत असलेला त्रास आणि इतर बाबींची माहिती दिली आहे. ‘ माझी आजी आशा भोसले यांना अत्यंत थकवा आणि छातीचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. उपचार सुरू असून सर्व काही लवकरच सुरळीत होईल अशी आशा आहे ‘, असे जनाई भोसले यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.



