नंदुरबार जिल्हा

‘त्या’ १९ प्रवाशांसाठी बसचालक ठरला ‘देवदूत’; कंटेनरच्या धडकेनंतर बस दुभाजकावर आदळण्यापासून वाचवली!; नवापूर तालुक्‍यातील थरार

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेजारून चाललेल्या कंटेनरने अचानक हुलकावणी देत दिलेल्या धडकेनंतर बस चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला. यामुळे यावलहून वापीकडे (गुजरात) निघालेल्या या बसमधील १९ प्रवाशांचा जीव बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल ते वापी ही बस (क्र. एमएच २० बीएल  ३९२२) धुळे सुरत महामार्गावरून जात असताना एक कंटेनर या बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ निमदर्डा फाट्यानजीक हॉटेल युवराजसमोर एक व्यक्ती रस्ता ओलांडत असताना कंटेनर चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात कंटेनर बसला जोरदार धडकला. यामुळे बसचा समोरील समोरील भाग चक्काचूर झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवासी धास्तावले होते.
अशा कठीण प्रसंगात धीर न सोडता बसचालक भिका तडवी याने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवले आणि दुभाजकावर आदळण्यासाठी निघालेली बस थांबवली. बसचालकाच्या या प्रसंगावधानामुळे बसमधील एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही आणि सर्वांचा जीव वाचला.
दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि इतरांनी तत्काळ बसकडे धाव घेत प्रवाशांना बसमधून खाली उतरवून घेत त्यांना धीर दिला. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
काही वेळाने सर्व १९ प्रवाशांना सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी चाळीसगाव- सुरत बसने रवाना करण्यात आले. या अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची नोंद घेत विसरवाडी पोलिसांनी कंटेनरच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button