नंदुरबार जिल्हा

वाजवा ढोल : नंदुरबारकरांचे नशीब उजाडले; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अखेर आज जिल्‍ह्यात आगमन, विविध विभागांच्‍या कामकाजाचा घेणार आढावा

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्‍य सरकारने नियुक्‍ती केल्‍यानंतर तब्‍बल महिनाभरानंतर अखेर आज, शुक्रवारी (दि. १७) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय नंदुरबार जिल्‍ह्याच्‍या मातीला लागत आहेत. यामुळे या निमित्ताने आपले नशीब फळफळल्‍याची भावना नंदुरबारकरांच्‍या मनात निर्माण झाली आहे. मुश्रीफ यांच्‍या उपस्‍थितीत सकाळी ११ वाजता विविध विभागांची आढावा बैठक पार पडणार आहे.
२०२५ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत माणिकराव कोकाटे नंदुरबारचे पालकमंत्री होते. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यापासून १८ मार्च २०२६ पर्यंत या जिल्ह्याचा कारभार पालकमंत्र्यांना प्रशासनच हाकत होते. अखेर १८ मार्चला राज्य सरकारने नंदुरबारच्या पालकत्वाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवली. इच्छा नसतानाही ही जबाबदारी सोपवण्यात आलेल्या मुश्रीफ यांनी दुसऱ्याच दिवशी ‘दुसरा कोणी नेता नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेत नाही तोपर्यंतच आपण हे पद सांभाळणार आहोत’, असे स्पष्ट केले होते. हीच नाराजी कायम ठेवत मुश्रीफ यांनी गेल्या महिनाभरापासून नंदुरबारकडे पाठ फिरवली होती.
मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कोल्हापूर जिल्ह्यातील बडे नेते आहेत. नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर कोल्हापूर ते नंदुरबार असा ६०० कि.मी.चा प्रवास नेहमी करावा लागेल, हे मुश्रीफ यांच्या नाराजीचे मूळ कारण होते. आणि त्याचमुळे ते नंदुरबारच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यास तयार नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
मात्र, आता नियुक्तीच्या तब्बल महिनाभरानंतर अखेर आज प्रथमच नंदुरबार शहरात येत आहेत. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्रीच नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठका देखील झालेल्या नाहीत. यासंदर्भातही मुश्रीपाज जिल्हा प्रशासनाला काही दिशा देतील, अशी अपेक्षाही नंदुरबार जिल्हावासीयांना लागून राहिली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते असून पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीनेही त्यांचे विशेष स्वागत केले जाणार असल्याचे माहिती सांगण्यात आली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button