मुख्य बातम्या

नाशिकला ३२ हजार कोटी, पण दक्षिण काशी उपाशी!; ‘प्रकाशा’च्‍या वाटेला उपेक्षाच; कुंभमेळा उंबरठ्यावर पण सोयीसुविधांची बोंब, स्‍थानिकांसह भाविकांमध्‍ये नाराजी

शहादा /प्रकाशा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आगामी कुंभमेळ्‍यासाठी राज्‍य सरकारने नाशिकच्‍या पदरात भरभरून दान टाकणे सुरू केले असले तरी नंदुरबार जिल्‍ह्यात तापी-गोमतीच्या पवित्र संगमावर वसलेल्‍या ‘दक्षिण काशी’ (प्रकाशा, ता. शहादा)ची झोळी मात्र अद्याप रितीच असल्‍याने या परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहस्‍थ साहेळ्‍याला अद्याप अवधी असल्‍याने या फायदा घेत राज्‍य सरकारने नाशिकप्रमाणेच प्रकाशाकडेही लक्ष देऊन या १०८ मंदिरांच्‍या गावाचा कायापालट करावा, अशी मागणी होत आहे.
नाशिकप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातील पवित्र भूमी असलेल्या प्रकाशामध्ये देखील सिंहस्थ पर्वणीचा सोहळा पार पडतो. या गावात १०८ मंदिरे असून, राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे या पवित्र भूमीला अवकाळा आली आहे. प्रकाशातील मंदिरांचा जिर्णोद्धार आवश्यक असून, येथे येणाऱ्या भाविकांना राहण्याची सुविधा देखील नाही. गावात सिंहस्थ पर्वणीवर मिरवणूक निघते. मात्र हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन ही अतिग्रहणे हटवणे गरजेचे झाले आहे. गावातील जवळपास सर्वच मंदिरांची अवस्था दयनीय झाली असून, या मंदिरांच्या परिसरात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सिंहस्थ पर्वणीच्या काळात प्रकाशामध्ये स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, या ठिकाणी उभारलेला घाट जीर्णावस्थेत असून, आताच त्याची देखभाल व दुरुस्ती केल्यास भविष्यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, सासंत सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
‘ब’ दर्जा, पण…
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्र आधी ‘क’ दर्जा गटामध्ये होते. मात्र मध्यंतरी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालून या तीर्थक्षेत्राचा ब दर्जा गटात समावेश करून घेतला. त्यावेळी प्रकाशातील सोयीसुविधांसाठी दोन कोटी रुपयांचा निधीही राज्य सरकारने दिला. त्यातून काही चांगले कामही झाली. मात्र त्यानंतर पुन्हा या तीर्थक्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि ती परिस्थिती आजही कायम आहे. यामुळे स्थानिकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
सध्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने पूर्ण लक्ष नाशिक शहर व परिसरावर केंद्रित केले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नाशिक व परिसरातील सोयीसुविधा वाढविण्यासाठी  तब्बल ३२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ही चांगली बाब मानली जात असली तरी त्याचवेळी सरकारकडून प्रकाशाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची बाब या तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांसह स्थानिकांच्या मनाला चटका लावणारी ठरत आहे. एकाच राज्यात असलेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये सोयी सुविधा उभारण्यात राज्य सरकार दुधा भाव का करीत आहे, नाशिकसाठी खजिना रिकामा करताना प्रकाशाच्या हक्काच्या निधीसाठी सरकारचा हात का आखडतो, वर्षानुवर्षे प्रकाशामध्ये भाविकांचे होणारे हाल, मोडकळीस आलेले रस्ते, घाटांची दुरवस्था सरकारला कधी दिसणार, असे सवाल भाविकांसह प्रकाशावासीयांकडून केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रकाशामध्ये पार पडलेल्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने प्रख्यात समाजसेवक गौतम खट्टर हे या शहरात आले होते त्यांनीही येथील विविध मंदिरांना भेटी दिल्यानंतर या मंदिरांच्या परिसरातील अस्वच्छता गाणी चे साम्राज्य आणि देखभालीचा अभाव पाहून प्रशासनाच्या अनास्थेवर कठोर शब्दात टीका केली होती. इतक्या मोठ्या आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या तळाकडे शासन आणि प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे खट्टर यांनी बोलून दाखवले होते. तसेच प्रकाशासारख्या पवित्र भूमीतील मंदिरांची पवित्रता आणि वारसा जपणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीचे आपणच रक्षण केले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशा शब्दात चुनावत कट्टर यांनी प्रकाशाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारकडे केली होती.
दरम्यान, आता प्रकाशा तीर्थक्षेत्रासाठी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भरीव निधी घोषित करण्याची मागणी वाढत असून, सरकार यावर काय निर्णय घेते याकडे प्रकाशावासी यांचे लक्ष लागले आहे.

१०८ मंदिरांचे शहर आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या प्रकाशा शहराचा कायापालट होणे आवश्यक आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सिंहस्थ पर्वानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीचा मार्ग अतिक्रमणे हटवून मोकळा करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्‍थानिक मंडळी सहकार्य करण्यास तयार आहेत. शिवाय मंदिरांच्या परिसरातील घाणीचे साम्राज्य आणि अस्वच्छता दूर करताना कुंभमेळ्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय व्हावी या दृष्टीने भक्त निवासाची आवश्‍यकता आहे. या पवित्र स्थळी सोयीसुविधांसाठी सरकार निधी देईल, अशी अपेक्षा आहे.
रामचंद्र पाटील (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद आणि अध्यक्ष, केदारेश्वर मंदिर विश्वस्त मंडळ, प्रकाशा)

नाशिकसारख्या तीर्थक्षेत्रासाठी जसा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो, तसाच समान न्याय दक्षिण काशी असलेल्‍या प्रकाशानगरीलाही मिळावा, अशी आम्हाला राज्य सरकारकडून अपेक्षा आहे. प्रकाशातील मंदिरांचा जिर्णोद्धार, स्वच्छता आणि शहराच्या विकासासाठी तातडीने राज्य सरकारने मोठा निधी द्यावा, ही आमची मागणी आहे.
पंडित भोई (जिल्हाध्यक्ष, भाजप मच्छीमार संघटना)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button