‘शुभमंगल’ कानी पडताच धडगावचे पोलिस झाले ‘सावधान’; खर्डात पोहोचून रोखला बालविवाह!; निनावी फोनमुळे ‘टीप’ मिळाली अन् अनर्थ टळला!

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मंडप सजला, सगळीकडे लगीनघाई सुरू होती, एकमेकांच्या गळ्यात हार टाकण्यासाठी नवरा नवरीही सजून उभे होते, लग्न घटिका समीप आली आणि गुरुजी ‘शुभमंगल सावधान’ म्हणणार इतक्यात पोलिस दाखल झाले. कुणाला काही कळण्याच्या आतच त्यांनी विवाह थांबवण्याचे आदेश दिले. हा प्रसंग कुण्या चित्रपटातील नव्हे तर प्रत्यक्षात धडगाव तालुक्यातील खर्डा येथील गावकर्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डा येथे वयाचे १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दोन कोवळ्या जीवांचे लग्न लावले जात असल्याची माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हा विवाह रोखण्याच्या हेतूने एक पथक खर्डाकडे रवाना केले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक भुसारे, हेड कॉन्स्टेबल संजय माळी, महिला पोलिस पाचुर्णे, कॉन्स्टेबल तडवी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश होता. या पथकाने गावात पोहोचताच विवाहस्थळ गाठून संबंधित नवरा- नवरीच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि नवरा- नवरीचे वय विवाहयोग्य असल्याचे दाखले मागितले. दोघांचेही आधारकार्ड तपासल्यानंतर त्यांचे दोघांचेही वय १७ वर्षे ११ महिने असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी उपवर मुलाच्या नातेवाईकांची समजूत काढून दोघांचेही वय विवाहासाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मुलाच्या नातेवाईकांनीही विभाग मान्य करून विवाह सोहळा रद्द केला जात असल्याची घोषणा केली.
मुलीच्या आई-वडिलांना पत्ताच नाही
महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आपल्या मुलीचा विवाह होत असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांना नव्हती असे समोर आले आहे. जिचा विवाह लावला जात होता त्या मुलीचे आई-वडील मजुरीसाठी गुजरातेत गेले होते. हीच संधी साधून मुलाच्या नातेवाईकांनी गुपचूप हा बालविवाह उरकण्याचा डाव आखला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, धडगाव पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या मुलीचे कोवळे हात पिवळे होण्यापासून थांबले गेले.
दरम्यान, पोलिसांनी केवळ बालविवाह रोखून न थांबता तत्काळ उपवर अल्पवयीन मुलाची आई आणि भावाविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हाही नोंदवला. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी नाना काल्या वळवी यांनी फिर्याद नोंदवली होती. दरम्यान, उपवर मुलीच्या आई-वडिलांना या प्रकरणाची माहिती देऊन तातडीने धडगाव पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. ते येथे पोहोचल्यानंतर संबंधित मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
एका महिन्यात दुसरी कारवाई
विशेष म्हणजे धडगाव पोलिसांनी अवघ्या महिनाभरात दुसर्यांदा बालविवाह रोखण्याची कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. याआधी २० मार्च रोजी तालुक्यातीलच तलई येथे कोवळ हात पिवळे करण्याची तयारी सुरू असताना धडगाव पोलिसांनी तेथे दाखल होत बालविवाह रोखला होता. आताही एका निनावी फोनमुळे एका कोवळ्या वयातील मुलीचा विवाह धडगाव पोलिसांनी रोखून कौतुकास्पद कारवाई केली आहे.
दरम्यान, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, असा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून कोवळ्या वयातील मुला-मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



