नंदुरबार जिल्हा

पहिल्‍याच बैठकीत पालकमंत्री मुश्रीफांनी घातला नंदुरबारकरांच्‍या जिव्‍हाळ्‍याच्‍या प्रश्‍नांना हात; आरोग्य, शिक्षण व पाण्याला प्राधान्य देण्‍याच्‍या प्रशासनाला सूचना

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. १७) जिल्‍हा प्रशासनाला केल्‍या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मुश्रीफ बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., सहायक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संगवी व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधांची मजबुती अत्यंत आवश्यक आहे, असे सांगत मुश्रीफ यांनी आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा, ग्रामीण भागात वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण साधने आणि शिक्षकांची उपस्थिती याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्याच्‍या कडक सूचनाही यावेळी करण्‍यात आल्‍या.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश देताना मुश्रीफ यांनी जलसंधारण प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या योजना व टँकर व्यवस्थापन यात पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यावर भर दिला. जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे तसेच शेतापर्यंत सिंचन सुविधा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना पालकत्र्यांनी प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस वेळापत्रक देण्याच्या सूचना केल्‍या.
यांचा घेतला आढावा…
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध महत्त्वाच्या विभागांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज, पोलिस विभाग, कृषी विभागाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, जिल्हा परिषदेकडील विविध योजनांची प्रगती, आदिवासी विकास, आरोग्य, वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी, पाणीटंचाई व पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना, तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी यांचा आढावा घेण्यात आला. नगर विकास विभागाच्या योजनांबरोबरच वन विभागाच्या विविध प्रकल्पांचेही सादरीकरण करण्यात आले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button